मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाचा पारा 40 अंशांवर गेला आहे. प्रचंड उकाड्यामुळे जिवाची काहिली होत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय म्हणजे राणीच्या बागेतील प्राणी-पक्ष्यांना 'गारेगार मेजवानी' मिळत आहे. उन्हाळ्यात त्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. यामुळे प्राणी-पक्षांना चांगलाच थंडावा मिळत आहे.
प्राण्यांना खाण्यासाठी फळे, केक आणि...
उकाडा वाढल्याने प्राण्यांना कलिंगड, आईस फ्रुट केक, केळी, ऊस, सफरचंद खाण्यासाठी दिले जात आहेत. शिवाय, डुबकी मारण्यासाठी थंडगार पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच, ऋतुमान बदलानुसार त्यांच्या आहारात बदल केला असल्याचे जीवशास्त्रज्ञ अभिषेक साटम यांनी सांगितले.
अशी घेतली जातेय प्राण्यांची काळजी
प्राण्यांना फळे थंड करून देण्यात येत आहेत. शिवाय, विविध प्रकारच्या फळांचा थंडगार फ्रूट केकही दिला जात आहे. नैसर्गिक अधिवासाप्रमाणे प्राण्यांना गुहा, डबकी, झुडपे तयार करण्यात आली आहेत. डबक्यातील पाणी प्रवाही असल्याने स्वच्छ आणि थंडगार राहत आहे. पक्ष्यांसाठीही भाजलेले चणे, शेंगदाणे, चिकू, पेरू, भोपळा, मध, गाजर अशी फळे दिली जात आहेत. हरणांसाठी हिरवा पाला, कलिंगड टांगून ठेवण्यात येत आहेत.
माकडांसाठी झाडांवर फळे टांगण्यात येत आहेत. तर, अस्वलाला नैसर्गिक अधिवासाप्रमाणे बॉक्समध्ये फळे शोधावी लागत आहेत. वाघोबालाही झाडावर टांगलेले चिकन, बिफ मिळवण्यासाठी उड्या माराव्या लागत आहेत.
हेही वाचा - कोविड मृत्यूदर वाढीला हवा प्रदुषण कारणीभूत; कसं काय घ्या जाणून
हेही वाचा - राज्यात लसच नाही, तर लस महोत्सव कसा साजरा करायचा? जयंत पाटील यांचा पंतप्रधानांना सवाल