मुंबई - राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सद्या सुरु असून यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. शुक्रवारी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि भाजपचे भाई गिरकर यांच्यात शाब्दिक खडाजंगी रंगली होती. यात नवाब मलिक यांनी, घोषणा या तोंडाने दिल्या जातात त्या हाताने देता येत नाहीत. जर हाताने घोषणा देता येत असतील तर त्या भाई गिरकर यांनी देवून दाखवावी, असे आव्हान दिले.
काय आहे प्रकरण -
घडले असे की, सभागृहाचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यवतमाळ स्थानिक प्राधिकरणातून विधान परिषदेवर निवडून आलेले काँग्रेसचे दुष्यंत चतुर्वेदी यांचा विधान परिषदेत परिचय करुन दिला. त्यावेळी सभागृहातील सदस्यांनी बाके वाजवून त्यांचे स्वागत केले. तसेच सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी हात वर करुन 'छत्रपती शिवाजी महाराज की जय'च्या घोषणा दिल्या. त्यावर भाई गिरकर यांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी घोषणा देताना हात वर केला नाही, असा आक्षेप घेतला.
नवाब मलिक यांनी गिरकर यांच्या आक्षेपाची तात्काळ दखल घेत त्यांना सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले की, 'घोषणा या तोंडाने देता येतात, हाताने घोषणा दिल्या जात नाहीत. जर हाताने घोषणा देत येत असतील तर गिरकर यांनी घोषणा देवून दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले. दरम्यान मलिक यांच्या आव्हानामुळे गिरकर यांची बोलती बंद झाल्याची दिसून आली.