मुंबई - मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा(एमएमआरडीए)च्या ताफ्यात पहिले रेल रोड मूव्हर मशीन (आरआरएम) दाखल झाले आहे. मेट्रो गाडी बंद पडली किंवा काही बिघाड झाल्यास गाडी किंवा डबे कारडेपोपर्यंत नेण्यास मदत करण्यासाठी या मशीनचा वापर होणार आहे. दरम्यान हे मशीन इटलीवरून 5 एप्रिलला मुबंई बंदरात दाखल झाले होते आणि आता दीड महिन्यानंतर ते चारकोप साईटवर दाखल झाले आहे.
एमएमआरडीएने पहिल्यांदाच असे मशीन आपल्या ताफ्यात दाखल केले आहे. हे मशीन रोड आणि रुळावर ही काम करत असल्याने मेट्रो सेवेत आल्यानंतर त्याचा वापर होणार आहेच, पण ते आताही वापरात येत आहे. त्यामुळे आता कराडेपोमध्ये रोलिंग स्टॉकच्या आधारे मेट्रो गाड्या तयार करण्याच्या कामात या मशीनचा मोठा उपयोग होणार आहे. त्यामुळे मेट्रो प्रकल्पासाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.
हे मशीन इटलीवरून मागवण्यात आले असून इटली येथील मोडीनामधील मे. झेफिर एस. पी.ए. येथून खरेदी करण्यात आले आहे. याची किंमत १.८९ कोटी इतकी आहे. हे मशीन 24 फेब्रुवारीला इटलीवरून रवाना झाले. 5 एप्रिलला मुंबई बंदरात दाखल झाले. मात्र, लॉकडाऊनमुळे हे मशीन प्रत्यक्ष साइटवर यायला दीड महिन्याचा काळ लागला आहे. आता या मशीनचा वापर तत्काळ केला जाणार आहे.