मुंबई - मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) समुद्रातील पुलाच्या पहिल्या गाळ्याच्या उभारणीच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीतील हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. स्वयंचलित लाँचिंग गर्डरद्वारा पुलाच्या प्रकल्पाच्या पहिल्या स्पॅनची उभारणी (erection of first span) होत आहे. या लाँचिंग गर्डरचे वजन 1000 मेट्रीक टन असून, लाँचिंग गर्डरची वजन उचलण्याची एकूण क्षमता सुमारे 1400 मेट्रीक टन इतकी आहे.
हेही वाचा - प्लास्टिकमुक्त राजस्थानचं स्वप्न उराशी बाळगून तरुण करतायेत शहरांची सफाई
मुंबई पारबंदर प्रकल्पामध्ये मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणाऱ्या सुमारे 22 किमी लांबीच्या 6 पदरी (3+3 मार्गिका) पुलाचा अंतर्भाव आहे. या पुलाची समुद्रातील लांबी सुमारे 16.5 किमी असून जमिनीवरील पुलाची एकूण लांबी सुमारे 5.5 किमी इतकी आहे. या पुलाला मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील शिवाजी नगर व राष्ट्रीय महामार्ग- 4 बी वर चिर्ले गावाजवळ आंतरबदल (Interchanges) प्रस्तावित आहेत. हा भारतातील सर्वात जास्त लांबीचा समुद्रावरील पूल ठरणार आहे.
हा प्रकल्प जपान आंतरराष्ट्रीय सहकार संस्थेच्या (JICA) कर्ज सहाय्याने राबविण्यात येत आहे. प्रकल्पाचे बांधकाम हे 3 स्थापत्य कंत्राटांद्वारे व 1 इंटेलीजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम कंत्राटाद्वारे करण्यात येणार आहे. पुलाच्या पायाचे व स्तंभांच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. त्याचप्रमाणे सेगमेंट कास्टींग आणि तात्पुरत्या पुलाच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. प्रकल्पाचा बांधकाम कालावधी सुमारे साडेचार वर्षांचा असून, त्यानुसार सप्टेंबर-2022 पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती मिळत आहे. स्वयंचलित लाचिंग गर्डरद्वारा पुलाच्या प्रकल्पाच्या पहिल्या स्पॅनची उभारणी (erection of first span) होत आहे.