मुंबई : 'वर्षा' शासकीय निवासस्थानी आज होलिकोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी होलिका मातेचे पूजन करून वंदन केले. तसेच समाजातील दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा आणि सद्विचारांचा सहवास घडावा अशी प्रार्थना केली. राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर अनेक सण मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येत आहे. गणेशोत्सव नवरात्रोत्सव दहीहंडी, शिवजयंती सुद्धा मोठ्या उत्साहात मुंबई ठाण्यासह राज्यभरात साजरी करण्यात आली. जनतेला सण मोकळ्या वातावरणात साजरी करता यावेत तसेच मनोरंजन व्हावे यासाठी राज्य सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताना दिसत आहे.
नैसर्गिक रंग वापरण्याचा संदेश : त्याचप्रमाणे आता होळी आणि धुलीवंदनाचा सणही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतः धुलीवंदनाचा आनंद घेताना नैसर्गिक रंग वापरत जनतेला रंगपंचमी खेळताना नैसर्गिक रंग वापरण्याचा संदेश दिला आहे यावेळी पर्यावरण पूरक होळी जनतेने साजरी करावी पाण्याचा अपव्य कमी करावा असे आवाहनही त्यांनी केले असून यावेळी राज्यातील जनतेला होळी आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या.
कुटुंबीयांसोबत रंगमंचमी साजरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ठाणे येथील शुभदीप या निवासस्थानी आपला नातू रुद्रांश मुलगा खासदार श्रीकांत शिंदे तसेच आपल्या पत्नी आणि अन्य कुटुंबीयांसोबत रंगपंचमी उत्साहात साजरी केली.
आनंदांच्या क्षणांची उधळण व्हावी : यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या कार्यकर्त्यांसोबत रंग खेळणे तसेच कुटुंबाची सुरक्षा पाहणारे पोलीस कर्मचारी आणि अन्य कर्मचाऱ्यांसोबतही त्यांनी रंगपंचमीचा आनंद लुटला. यावेळी सर्व राज्यातील जनतेला रंगपंचमीच्या शुभेच्छा देताना कर्मचारी आणि पोलीस बांधवांना गोड खायला घालून मुख्यमंत्र्यांनी या सणाचा आनंद अधिक द्विगुणीत केला. होळी, धूलिवंदनानिमित्त मुख्यमंत्री यांनी शुभेच्छा दिल्या. या सणांच्या उत्सव-उत्साहातून सुख, समृद्धी आणि आनंदांच्या क्षणांची उधळण व्हावी अशी मनोकामना व्यक्त करून पर्यावरणपूरक होळीचे, नैसर्गिंक रंगाच्या वापराचे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश -
राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. सरकार संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे व पंचनामे करावेत असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
अवकाळी पाऊस : ठाणे, पालघरसह राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. वाशिम, नाशिक, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), पैठण, गंगापूर परिसरातील अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. मुंबई, ठाण्यासह उत्तर-मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असल्याने बऱ्याच ठिकाणी आणखी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत.
हेही वाचा - Maharashtra Rain Update : राज्यात काही भागात गारपीट, तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता