मुंबई - राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त, भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी नीला सत्यनारायण यांच्या निधनाबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त केला आहे.
प्रशासकीय कारकिर्दीबरोबरच साहित्य-कला क्षेत्रातही कामगिरीची मोहोर उमटविणारे अनुभवी आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून नीला सत्यनारायण यांना महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल असे सांगून मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, की मुंबईत मराठी कुटुंबात जन्मलेल्या नीला सत्यनारायण या महाराष्ट्रातील अनेक युवकांसमोर प्रशासकीय सेवेविषयीच्या प्रेरणास्थान होत्या. निवडणूक आयोगाला अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासारखी त्यांची इतरही अनेक कामे वैशिष्ट्यपूर्ण होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सेवानिवृत्त आयएएस अधिकारी, राज्याच्या पहिल्या महिला निवडणुक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. प्रशासकीय सेवा आणि साहित्य क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या युवकांसाठी त्या मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत होत्या. उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, की भारतीय प्रशासकीय सेवेतील कर्तव्यतत्पर अधिकारी म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ राज्याची सेवा केली. राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त म्हणूनही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारीपदाची जबाबदारी पार पाडत असताना साहित्यक्षेत्रातही त्यांनी स्वत: चे वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनाने एक कुशल प्रशासक, उत्तम साहित्यिक, संवेदनशील व्यक्तिमत्व आपण गमावलं आहे. त्यांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरण्याचे बळ त्यांच्या कुटुंबीयांना मिळो, अशी प्रार्थनाही उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे.