मुंबई - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अतिशय जवळचे मानले जाणारे मिलिंद नार्वेकर मागील दोन दिवसांपासून चर्चेत आहेत. आता पुन्हा एकदा नार्वेकर यांचा नवा फोटो चर्चेचा विषय बनला आहे. कारण, धनुष्यबाण चिन्ह. ठाकरे आणि नार्वेकरांमध्ये सध्या दुरावा आहे. अशातच चिन्हाचा वाद न्यायप्रविष्ट असताना, मिलिंद नार्वेकर यांनी एमसीए निवडणुकीत धनुष्यबाण चिन्ह असलेला टीशर्ट घातल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, नार्वेकरांचा रोख कुणाकडे आहे, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर दावा ठोकला. प्रकरण न्याय प्रविष्ट असताना, सचिव मिलिंद नार्वेकर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपासून चार हात लांब राहिले. दुसरीकडे शिंदे आणि नार्वेकरांमध्ये वरच्यावर भेटीगाठी वाढल्या. पक्षप्रमुख ठाकरेंनी त्यामुळे नार्वेकरां ऐवजी दिवगंत, बाळासाहेबांचे निकटवर्तीय रवी म्हात्रे यांच्याकडे सर्वस्वी जबाबदारी सोपवली. शिंदेंच्या भेटीगाठी आणि उद्धव ठाकरेंनी राईट हॅंन्ड बदल्याने नार्वेकर शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला उधाण आले. नार्वेकरांनी सगळे आलबेल असल्याचे दाखवत यावर पांघरुण घालायचा प्रयत्न केला. परंतु, नार्वेकरांनी ठाकरेंचे विरोधक अमित शहांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मिलिंद नार्वेकर यानंतर पुन्हा चर्चेत आले. आता एका वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीमुळे नार्वेकर दिवाळीच्या पहिल्या दिवशी चर्चेत आले आहेत.
शिवसेनेचा चिन्ह कोणाचा हा वाद मिटवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि शिवसेनेचे धनुष्यबाण गोठावले आहे. आयोगाने ठाकरे गटाला मशाल तर शिंदेंच्या गटाला ढाल- तलवारीचे चिन्ह दिले. मात्र, मुंबईतील वृत्तपत्रांमध्ये एमसीए कार्यकारिणी निवडणुकीत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल मिलिंद नार्वेकर यांना शुभेच्छा देण्यासाठी एक जाहिरात दिली. नार्वेकर यांच्या टीशर्टवर धनुष्यबाण चिन्ह असल्याचे यात दिसत आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर येत्या 1 नोव्हेंबर रोजी आयोगाकडे पुढील सुनावणी आहे. नार्वेकर त्यात शिंदे गटाच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे टी शर्ट वरील चिन्हाचा रोख नेमका कोणाकडे, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातो आहे.