मुंबई - महाराष्ट्र सरकारने भाजप खासदार नारायण राणे यांची सुरक्षा काढून घेतल्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने राणेंना वाय श्रेणीची सुरक्षा पुरविली आहे. आता नारायण राणे यांना सीआयएसएफचे सुरक्षा कवच मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच, राज्य सरकारने महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही भाजप नेत्यांची सुरक्षेत कपात केली. ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे भाजपने सडकून टीका केली होती.
राज्य सरकारने सुरक्षा कमी करण्याचा निर्णयानंतर केंद्र सरकारने नारायण राणे यांना वाय श्रेणीची सुरक्षा दिली आहे. आता नारायण राणे यांच्या सुरक्षा ताफ्यात सीआयएसएफचे 11 जवान तैनात असतील. वाय श्रेणीची सुरक्षा हे संरक्षण सुरक्षेचे तिसरे स्तर मानले जाते. ज्यामध्ये विद्यमान व्यक्तीच्या मृत्यूचा धोका कमी असतो. अशा लोकांना हे संरक्षण दिले जाते.
महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस, राज ठाकरे आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची सुरक्षा महाराष्ट्र सरकारने कमी केली आहे. आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा झेड प्रकारातील होती जी कमी करून वाय करण्यात आली आहे. बुलेट प्रूफ कार देखील देवेंद्र फडणवीस यांच्या काफिलातून काढण्यात आली आहे. त्याच बरोबर, राज ठाकरे यांची झेड प्रकारातील सुरक्षा वायमध्ये बदलली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना देण्यात आलेली वाय प्लस सुरक्षा कमी करून, त्यांना आता एस्कॉर्ट सुरक्षा पुरवण्यात आली आहे.