मुंबई : राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने बुधवारी राज्यभर मूक सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. राहुल गांधी यांच्यावरुन काँग्रेसने संपूर्ण देशात मूक सत्याग्रह आंदोलन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपवर जोरदार निशाना साधला आहे.
काय म्हणाले रोहित पवार : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ मुंबई काँग्रेसच्या वतीने पुकारलेल्या एकदिवसीय मूक आंदोलनात आमदार रोहित पवार सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यातील जनतेचे अनेक प्रश्न आहेत. शेतकरी पाऊस नसल्याने त्रस्त आहे. तर, दुसरीकडे राज्यकर्ते खुर्चीसाठी एकमेकांसमोर उभे आहेत. आमदार रोहित पवार म्हणाले की, नवनिर्वाचित 9 मंत्र्यांना 10 दिवस उलटूनही खाते वाटप झालेले नाही. मंत्रिमंडळात दर्जेदार खाते मिळावे यासाठी तिन्ही पक्षात स्पर्धा सुरू असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
शिंदे गटातील आमदार नाराज : भाजपने महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उपयोग केला. मुख्यमंत्र्यांसोबत गेलेल्या नऊ जणांना मंत्रिपदे दिली. मात्र, खातेवाटपाबाबत अद्यापही चर्चाच सुरू आहेत. शिंदे गटातील 40 आमदारांना मंत्रिपद मिळालेले नाही, शिंदे गटात अस्वस्थता आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदार नाराज असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
तिन्ही पक्षांमध्ये तणाव : राष्ट्रवादीपासून फारकत घेऊन शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांना अद्याप खाते देण्यात आलेले नाही. अजित पवार गटाला दिलेली आश्वासने पाळली नाहीत. त्यामुळे तिन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सत्ता कमी करण्यासाठी भाजपला एक वर्ष लागले, असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकला नाही : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून महाराष्ट्राचा इतिहास दिल्लीपुढे कधीच झुकलेला नाही. सध्याचे केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्राला दिल्लीकडे झुकवण्याचा प्रयत्न करत आहे. ज्याला शरद पवारांचा विरोध आहे. म्हणून मी शरद पवारांच्या पाठीशी आहे. महाराष्ट्र कधीच दिल्लीपुढे झुकला नाही, आम्ही झुकणार नाही. शिंदे गटाच्या विरोधामुळे खातेवाटपाबाबत निर्णय होत, नसल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
हेही वाचा - Balasaheb Thorat On CM : मंत्रिमंडळ खातेवाटपावरून बाळासाहेब थोरातांची शिंदेंवर टीका