नवी मुंबई - डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स सेंटर येथे 'तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकॅडमी'चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उपस्थित होता. या अकॅडमीमध्ये 'उदयोन्मुख क्रिकेटपटूंना त्यांच्या कौशल्यामध्ये वाढ करता येईल व सर्वोच्च स्तरांवर खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करता येईल', असे यावेळी सचिनने म्हटले.
हेही वाचा - Asia Cup : पाकला यजमानपद खुशाल करु द्या, पण भारत पाकमध्ये खेळणार नाही - BCCI
जागतिक दर्जाचे क्रिकेटपटू घडवण्याचा प्रयत्न करत असताना तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकॅडमीने डी. वाय पाटील नवी मुंबई येथे जगातील पहिली अद्ययावत क्रिकेट अकॅडमी व स्पोर्टस सेंटर सुरू केल्याचे जाहीर केले आहे. दोन बॅचमध्ये सहभागी झालेल्या ७ ते २१ वर्ष वयोगटातील २०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना जागतिक मुख्य प्रशिक्षक जॉष नेपेट, डी. वाय. पाटील मधील प्रमुख प्रशिक्षक व माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या नेतृत्वाखाली अनुभवी प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली खेळातील बारकाव्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. क्रिकेट प्रशिक्षणाव्यतिरिक्त कंडीशनिंग, मानसिकता विकास, रणनीती यावर आधारित सत्रेही आयोजित केली जाणार आहेत.
या सत्रांमुळे विद्यार्थ्यांना क्रिकेटमध्ये सुधारणा करण्यासाठी मदत होणार आहे. 'आम्ही गेली दोन वर्षे लंडन, मुंबई, नवी मुंबई, पुणे, येथे क्रिकेट शिबिरांचे आयोजन करतो, या शिबिरांना भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने पूर्ण वेळ अकॅडमी स्थापन करण्याचे आम्ही ठरवले होते, आज आमचे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले, असे सचिन तेंडुलकर यांनी म्हटले.
'मी लहान असताना खट्याळ मुलगा होतो, मात्र खेळाने मला आयुष्याच्या वेगळ्या वळणावर नेले. तुम्ही प्रॉपर्टी विकत घेऊ शकता पण आवड विकत घेऊ शकत नाही. माझा मोठा भाऊ हा माझा पहिला प्रशिक्षक. मी त्याच्यासोबत माझ्या करिअरची सुरवात केली. माझे दुसरे प्रशिक्षक म्हणजे रमाकांत आचरेकर सर. या दोन व्यक्ती माझ्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण आहेत. ज्या खेळाने मला एक संधी दिली त्या खेळाला मला वेगळा दिशेला नेऊन ठेवायचे आहे. ही अकॅडमी फक्त मुलांसाठी नसून मुलींसाठीही आहे. त्यामुळे मुलींनीही आपले प्रावीण्य दाखवावे. आयुष्यात पुढे जायचे असेल तर शॉर्ट-कट निवडू नका, असेही मास्टर ब्लास्टरने म्हटले आहे.