मुंबई - कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये राज्य सरकारचे उत्पन्नाचे सगळे स्रोत बंद आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणी वाढत असल्याने आता हळूहळू उत्पन्न वाढवण्याकडेही भर दिला जात आहे. त्यातूनच सोमवारपासून नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचे मुंबईतील 10 कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे एका दिवसांत या 10 कार्यालयाच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत 23 लाख 74 हजार रुपयांची भर पडली आहे.
नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग हा राज्य सरकारला सर्वाधिक महसूल देणाऱ्या स्रोतापैकी एक मुख्य स्रोत आहे. त्यातही मुंबईत मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार सर्वाधिक होत असल्याने मुंबईतून सरकारला महिन्याला 450 ते 500 कोटींचा महसूल मिळतो. पण लॉकडाऊनमुळे नोंदणी केवळ ऑनलाइन पद्धतीने सुरू होती. पण दस्तनोंदणी होत नव्हती. 1 ते 10 मे पर्यंत केवळ 1 दस्तनोंदणी झाली होती आणि त्यातून केवळ 424 रुपये इतकाच महसूल मिळाला होता. त्यामुळे सरकारची चिंता वाढली होती.
या पार्श्वभूमीवर चौथ्या लॉकडाऊनमध्ये मुंबईतील नॉन-कंटेंमेंट झोनमधील 10 नोंदणी कार्यालये अखेर सोमवारपासून सुरू केली आहेत. मुंबई शहर-1, मुंबई शहर-2, मुंबई शहर विवाह नोंदणी कार्यालय, अंधेरी2, अंधेरी 3, अंधेरी 4, बोरिवली 7, कुर्ला 4 आणि मुंबई उपनगर विवाह नोंदणी कार्यालय अशी ही 10 कार्यालये आहेत. सर्व नियम पाळत येथे नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे.
सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही कार्यालये सुरू असतील. दरम्यान काल पहिल्याच दिवशी 487 दस्तांची नोंद झाली असून यातून 23 लाख 74 हजार रुपये इतका महसूल मिळाला आहे. ही दिलासादायक बाब असून यात पुढे आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.