मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे बंधाऱ्यावरील न्युमॅटीक झडपांच्या दुरुस्तीचे काम १७ मे ते २१ मेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या दुरुस्ती कामामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यामध्ये १७ ते २१ मे या कालावधीत १० टक्के पाणीकपात करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या पाणीपूरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
पाणी कपात, पाणी जपून वापरा -
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणातून पिसेमध्ये पाणी सोडले जाते. या पिसे बंधाऱ्यातून येथील जलशुध्दीकरण केंद्रात पाणी आणून, तेथून शुध्द पाण्याचा पुरवठा केला जातो. पिसे बंधाऱ्याच्या झडपांच्या कामांचा प्रस्ताव मागील स्थायी समितीच्या बैठकीत समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मंजूर केला होता. त्यानंतर या कामाचा कार्यादेश देत हे काम आता हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे या बंधाऱ्यावरील न्यूमॅटीक झडपांच्या तातडीच्या दुरुस्तीचे काम येत्या १७ ते २१ मे २०२१ पर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या दुरुस्ती कामामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यामध्ये सोमवारी १७ मे ते शुक्रवारी २१ या कालावधीत १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. मुंबईकर नागरिकांनी या पाणीकपात कालावधीत पाण्याचा यथायोग्य साठा करावा आणि पाणी जपून वापरावे. तसेच मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जलअभियंता व उपायुक्त अजय राठोर यांनी केले आहे.
३७५० दशलक्ष लीटर पाणी -
मुंबईला सात धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. या धरणांमधून मुंबईकरांना दिवसाला ३७५० एमएलडी म्हणजेच दशलक्ष लीटर इतका पाणीपुरवठा दिवसाला केला जातो. दरवर्षी मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी १४ लाख ५० हजार दशलक्ष लीटर इतके पाणी लागते.
हेही वाचा - अरबी समुद्रात निर्माण होतंय चक्रीवादळ.. अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा