मुंबई - विधानसभा सदस्यांद्वारे निवडून देण्यात येणाऱ्या विधानपरिषदेतील दहा आमदारांची मुदत येत्या 7 जुलै 2022ला संपते आहे. ( MLC Term will End ) त्यामुळे या रिक्त होणाऱ्या दहा जागांवर कोणाची वर्णी लागणार? यासाठी आता चुरस निर्माण झाली आहे.
सर्वाधिक आमदार भाजपचे -
राज्याच्या विधान परिषदेतील आमदारांचे संख्याबळ आता पुन्हा एकदा कमी होणार आहे. दहा आमदारांची मुदत येत्या ७ जुलै २०२२ रोजी संपते आहे. आधीच राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या जागा रिक्त असताना आता आणखी दहा सदस्य कमी होणार आहेत. त्यामुळे या सदस्यांच्या निवडणुका लवकरच घोषित होतील,असे मानले जाते आहे. मुदत संपत आलेल्या आमदारांमध्ये सर्वाधिक भाजपचे सहा आमदार तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन आमदार आहेत.
- कोणत्या आमदारांची संपणार मुदत?
- येत्या ७ जुलै २०२२ रोजी मुदत संपणाऱ्या आमदारांमध्ये विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर
- उद्योग मंत्री सुभाष देसाई
- विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर
- भाजपचे आमदार प्रसाद लाड
- सुरजितसिंग ठाकूर
- विनायक मेटे
- सदाशिव खोत
- राष्ट्रवादीचे आमदार संजय दौंड
- भाजपचे दिवंगत आमदार आर. आर. सिंह
- शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांची मुदत संपते आहे.
हेही वाचा - Jayant Patil Answered To Imtiaz Jaleel : आधी एमआयएमने हे सिद्ध करावे की, ते भाजपाची बी टीम नाही - जयंत पाटली
- कोणाला मिळणार संधी?
विधान परिषदेच्या दहा जागा रिक्त होत असल्याने त्या जागी त्याच आमदारांना पुन्हा संधी दिली जाते की नव्या आमदारांचा विचार केला जातो याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुख्य म्हणजे महाविकास आघाडीकडे १७० आमदारांचे संख्याबळ आहे. या संख्याबळाच्या जोरावर महाविकास आघाडी सरकार पाच जागा जिंकून आणू शकते तर आणखी एक जागा ते आपल्या पदरात अन्य पक्षांच्या मदतीने पाडू शकतात. भाजपचे विधानसभेतील संख्याबळ कमी झाल्याने यावेळेस सहाऐवजी त्यांचे चारच आमदार निवडून येऊ शकतात. यावेळी प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपचे घटक पक्ष भाजपकडे जागा मागण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांच्यापैकी देसाई यांना मंत्रीपदी असल्याने पुन्हा संधी मिळू शकते तर आदेश बांदेकर यांचा विचार होण्याची शक्यता पक्षातून व्यक्त केली जात आहे.