मुंबई : कोल्हापूर येथिल सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या तिन्ही मुलांवर अंमलबजावणी संचालनालयाकडून गुन्हा दाखल केलेला आहे, त्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत मुलांची चौकशी सुरू आहे. ईडीला यात आर्थिक गैरव्यवहाराचा संशय आहे. त्यामुळेच अंमलबजावणी संचलनालयाने त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला आहे . यातून मुक्तता मिळवण्यासाठी त्यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे.
त्यांच्या जामीन अर्जाला ईडीने विरोध केला होता. मात्र ईडी कडून गेल्या काही सुनावणीत कडाडून विरोध करण्याची भूमिका सौम्य झाली आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये तिन्ही मुलांच्या वतीने बाजू मांडणाऱ्या वकिलांनी वडील आणि मुले यांच्यावर एकाच प्रकारची केस आहे. वडिलांप्रमाणे मुलांना देखील दिलासा दिला पाहिजे असा युक्तिवाद केला. तिन्ही मुलांच्या बाजूचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला. त्यामुळे आजची सुनावणी न्यायालयाने तहकुब करत अंतरिम दिलासा दिला. पुढील सुनावणी 17 ऑगस्ट रोजी निश्चित केली आहे.
मंत्री हसन मुश्रीफ यांचा जामीन अर्ज याआधी सत्र न्यायालयाने फेटाळल्यामुळे आता मुलांना देखील त्यांचा जामीन अर्ज फेटाळला जातोय की काय याची धाकधुक होती. त्यामुळे त्यांनी सत्र न्यायालयाच्या विशेष पी एम एल ए न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. जेव्हा हसन मुश्रीफ यांच्याबाबतचा कोणताही निकाल लागेल. त्या निकालाचे परिणाम त्यांच्या मुलांच्या निकालावर होणार आहेत.
ज्याप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयामध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संदर्भात मागील आठवड्यामध्ये सुनावणी झाली आणि त्यांना ऑगस्ट महिन्यामध्ये तिसऱ्या आठवड्यापर्यंत दिलासा मिळाला. त्यामुळे त्याच गुणवत्तेच्या आधारावर एकाच प्रकारच्या केसमुळे आता यांना देखील हा दिलासा प्राप्त झालेला आहे. त्यामुळे अंमलबजावणी संचलनालयाकडून ऑगस्ट पर्यंत तरी तिन्ही मुलांची जबरदस्तीने चौकशी आणि सक्ती टळलेली आहे.
साखर कारखाना खरेदी व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आहे. त्यांच्या निकटवर्तीयांनी कारखाना खरेदी केल्याच्या पण तक्रारी त्यांच्या विरोधात करण्यात आले त्या नुसार ईडीने त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आणि त्यांच्या संबंधित प्रतिष्ठानांवर धाडी टाकल्या. सध्या त्यांच्या विरोधातील कारवाईला पण न्यायालयाने तात्पूरता दिलासा दिलेला आहे.