मुंबई - पश्चिम महाराष्ट्रामध्ये सध्या आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांच्या दिंड्या सुरू आहेत. मात्र, वारकऱ्यांच्या या दिंडीमध्ये आज आणखी एका दिंडीची अचानक भर पडली आहे. ही राजकीय दिंडी असून हैदराबादमधून 300 ते 400 वाहनांसहित ही दिंडी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल होत आहे. मात्र, या दिंडीचा उद्देश केवळ विठुरायाचे दर्शन नसून महाराष्ट्रामध्ये शक्तिप्रदर्शन करीत भारत राष्ट्र समिती या पक्षाची पायंमुळं रोवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
भारत राष्ट्र समितीच्या रडावर नाराज नेते - भारत राष्ट्र समिती या केसीआर यांच्या पक्षाला महाराष्ट्रामध्ये हातपाय पसरण्यासाठी स्थानिक नेत्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मराठवाड्यातील दुसऱ्या फळीतील अथवा विधानसभा, लोकसभा निवडणुकांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या नेत्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टीने विदर्भ, मराठवाड्यातील काही नेते केसीआर यांच्या तंबूत दाखल झाले आहेत. आता पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत श्रीगोंद्याचे घनश्याम शेलार आणि पंढरपूरचे भगीरथ भालके हे दोन नेते केसीआर यांच्या छावणीत दाखल होतील.
पक्षाने दखल घेतली नाही - पश्चिम महाराष्ट्र हा साखरपट्टा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातील सहकारातील 119 कारखान्यांपैकी 75 साखर कारखाने या पाच जिल्ह्यांमध्ये आहेत. यापैकी बहुतांश साखर कारखाने हे कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या ताब्यात आहेत. याच कारखान्यांच्या जीवावर या पट्ट्यातील राजकारण चालत असते. मात्र, पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची सूत्रे राष्ट्रवादीकडून हिसकावून घेण्यात आली. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके या कारखान्याचे अध्यक्ष होते. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार भगीरथ भालके हे पक्षावर नाराज आहेत. महाविकास आघाडीच्या तत्कालीन नेत्यांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपली दखल घेतली नाही. शिखर बँकेच्या प्रशासकांना सांगून मदत केली नाही, म्हणूनच आपल्याला कारखान्यातून पराभव पत्करावा लागला. कारखाना हातचा गेला अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. जर पक्षाला आपली गरज नसेल तर आपण पक्षासोबत का राहायचे? असा सवाल ही या निमित्ताने भालके यांनी उपस्थित केला आहे.
बीआरएसच्या विचाराचा आम्हाला कुठलाही धोका नाही. आमचे मतदार त्यांच्याकडे जातील अशी कुठलीही परिस्थिती नाही. त्यामुळे बीआरएसचा आम्हाला कुठलाही धोका नाही. महाराष्ट्रात त्यांच्याकडे जाणारे जे लोक आहेत ते काँग्रेस, राष्ट्रवादीचे असावेत - शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर पाटील
बीआरएसचा हिंदुत्वाला धोका नाही - शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर पाटील यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, केसीआर यांच्या पक्षाची विचार प्रणाली वेगळी आहे. त्यांचा आणि हिंदुत्वाचा काहीही संबंध नाही. त्यांचे विचार कुठेही हिंदुत्वाशी सांगड घालणारे नाहीत. आमचा मतदार वर्ग हा हिंदुत्ववादी विचारांचा मतदार आहे. त्यामुळे त्यांच्या विचाराचा आम्हाला कुठलाही धोका नाही. आमचे मतदार त्यांच्याकडे जातील अशी कुठलीही परिस्थिती नाही. त्यामुळे बीआरएसचा आम्हाला कुठलाही धोका नाही. महाराष्ट्रात त्यांच्याकडे जाणारे जे लोक आहेत ते काँग्रेस, राष्ट्रवादीचे असावेत. तिथे असलेल्या नाराजांची कुठेतरी सोय व्हावी म्हणून त्यांनी तो स्वीकारलेला मार्ग असावा, असेही भोर पाटील म्हणाले.
जनता किंवा महाराष्ट्रातील आघाडीचे नेते बीआरएमसमध्ये जातील, असे आपल्याला बिलकुल वाटत नाही. काँग्रेसमध्ये कुठल्याही पद्धतीची नाराजी नाही. त्यामुळे बीआरएससारख्या पक्षाला कोणीही धारा देणार नाही - काँग्रेसचे प्रवक्ते काका पाटील
बीआरएस म्हणजे पावसाळ्यातली छत्री - बीआरएस यांच्या महाराष्ट्रातील शिरकावाबद्दल विचारले असता काँग्रेसचे प्रवक्ते काका पाटील म्हणाले की, यापूर्वीही महाराष्ट्रात अनेक बाहेरील पक्षांनी येऊन बस्तान बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यापैकी कुणालाही यश आले नाही. सपा, बसपा, एमआयएम आणि आप या पक्षांना महाराष्ट्रातील जनतेने फारसा थारा दिल्याचे आपल्याला दिसत नाही. हे पक्ष म्हणजे पावसाळ्यातील छत्र्यांप्रमाणे असतात. सध्या पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे अशा छत्र्या महाराष्ट्रात जागोजागी उगवताना दिसल्या तर त्यात आश्चर्य वाटू नये, मात्र या पक्षाकडे जनता किंवा महाराष्ट्रातील आघाडीचे नेते जातील, असे आपल्याला बिलकुल वाटत नाही. काँग्रेसमध्ये कुठल्याही पद्धतीची नाराजी नाही. त्यामुळे बीआरएससारख्या पक्षाला कोणीही धारा देणार नाही. या छत्र्या लवकरच मिळतील ज्या वेगाने ते पंढरपुरात दाखल होत आहेत त्याच वेगाने ते परत जातील, असा दावा पाटील यांनी केला आहे.
हेही वाचा -