मुंबई - राज्यात शैक्षणिक सत्राची लवकर सुरुवात करून शाळा आणि शिक्षण सुरू करण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या अट्टहासाच्या विरोधात आता शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. कोरोनाचे संकट इतके गडद झालेले असताना सरकारने शाळा सुरू करण्याची कोणतीही घाई करू नये, अन्यथा आम्हाला विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी रस्त्यावर येऊन आंदोलन करावे लागेल, असा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे.
शिक्षक आमदार नागो गाणार म्हणाले, की सरकार १५ जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू करण्याचा अट्टहास करत आहे, ही अत्यंत खेदाची आणि गंभीर बाब आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळणारी आणि विद्यार्थ्यांना कोरोनाच्या संकटात लोटणारी ही बाब आहे. याबाबत सरकारला एक सविस्तर प्रस्ताव सादर केला आहे. त्यात कोरोनाची परिस्थिती जोपर्यंत पूर्णपणे नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत शैक्षणिक सत्र सुरू करू नये, असे म्हटले आहे. त्यानंतरही सरकारने आपला अट्टहास सुरू ठेवला, तर नाईलाजाने आम्ही रस्त्यावर उतरून पालकांसोबत आंदोलन करू, असा इशारा आमदार गाणार यांनी दिला आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे सचिव सुधीर घागस यांनी मागील महिन्याभरापासून सरकारकडे पत्रव्यवहार करून शाळांचे सत्र हे कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येईपर्यंत सुरू करून नये, अशी मागणी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली, तर दुसरीकडे शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनीही सरकारने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून सर्वच शिक्षण आणि शाळा उशिराने सुरू कराव्यात, अशी मागणी केली आहे.