मुंबई - राज्यात मागील काही दिवसांमध्ये धोकादायक वळणावर येऊन पोहोचलेल्या कोरोनाच्या संकटाने राज्यातील जनता जगण्या मरण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला आपली काळजी घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (गुरुवार)फेसबूक लाईव्हवरून जनतेशी संवाद साधला.
हजारो नव्हे तर लाखो जणांनी पवारांचा हा संवाद पाहिला आणि अनेकांनी पवारांच्या या संवादाला प्रतिसादही दिला. शेतकऱ्यांपासून ते अनेक ठिकाणी अडकलेल्या जनतेनी आपली व्यथा प्रतिसादाच्या माध्यमतून पवारांपर्यंत कळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, या आश्चर्याची बाब म्हणजे राज्यातील अनुदानित शाळा-महाविद्यालयांवर कार्यरत असलेल्या शिक्षकांनी पवारांकडे आपल्या अनुदानाचा विषय समोर आणून त्यासाठीची चिंता व्यक्त केली.
अनेकांनी आमचा पगार कधी मिळेल, असा सवाल करत अनुदानाचा विषय लवकर सोडविण्याची मागणी केली. तर, एका शिक्षकाने चक्क कोरोनापेक्षा शिक्षकांचा प्रश्न गंभीर असल्याची प्रतिक्रिया नोंदवली. दुसरीकडे ही वेळ सर्वांनी मिळून कोरोनासारख्या महामारीशी लढण्याची आहे, याची आम्हा सर्वांना जाणीव आहे. पण गेल्या 20 वर्षांपासून कोरोनापेक्षा भयंकर अशा विनानुदनितच्या शापाने आमच्या आयुष्याची राखरांगोळी झाली साहेब, असे सांगत एका शिक्षकाने आपली व्यथा पवारांकडे प्रतिसादाच्या माध्यमातून मांडली. आपल्या सारख्या कर्मवीरांनी, जाणत्या नेतृत्वाने यात लक्ष घाला. आमचा २० वर्षाचा वनवास संपवून आम्हाला सर्व विनाअनुदानित, अंशतः अनुदानित, घोषित, अघोषित, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, तुकड्यांना १०० टक्के न्याय मिळवून देण्याची मागणीही केली आहे.
अनुदानितच्या शिक्षकांसोबत १ हजार ३५८ दिव्यांग समावेशीत शिक्षकांचे पगार प्रत्येक शिक्षणाधिकारी यांचे अकाउंटमध्ये 2 महिन्यांपासून पडून असून यावर योग्य तोडगा काढण्यासाठी शिक्षणमंत्री याना सांगण्याची विनंती करण्यात आली. यासोबत अनेक प्रकारचे जीआर काढण्याची, मागणीही अनेकांनी पवारांकडे आपल्या प्रतिसादातून केली.