मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिक्षकांवर परीक्षेच्या कामाचा ताण असल्याचे सांगत शिक्षक संघटनांनी त्यांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. शिक्षक भारतीसह महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने याबाबत पुढाकार घेतला आहे.
शिक्षक नेते आणि आमदार कपिल पाटील यांनी शिक्षकांना लोकसभा निवडणुकीच्या कामातून बाजूला ठेवण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. यावेळी त्यांनी शिक्षकांवर कामाचा ताण वाढणार असल्याचेही नमूद केले. या मागणीचे पत्र त्यांनी उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे. याबाबत आयोगाने आपली दखल घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
पाटील यांनी आयोगाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची सार्वत्रिक निवडणुकीसाठी संवैधानिक जबाबदारी म्हणून काम करण्यास काहीही हरकत नाही. त्यासाठी सर्व शिक्षक काम करतील. मात्र, निवडणुकीच्या पुर्व तयारीच्या कामासाठी, मतदार यादी पुनर्निरीक्षणासाठी, विभागीय ऑफिसर किंवा तत्सम कामांसाठी मुंबई शहरातील शिक्षकांच्या सेवा २ महिन्यांसाठी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. असे झाल्यास शाळांचे कामकाजच बंद पडेल. सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा आणि त्यांच्या पेपर तपासणीचे काम सुरू आहे. वार्षिक परीक्षांचे नियोजनही सुरू असल्याने शिक्षकांना निवडणूक कामासाठी देण्यात आलेल्या नोटीसा मागे घ्याव्यात, अशी मागणी पाटील यांनी केली.
दुसरीकडे शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनीही शिक्षकांवर अतिरिक्त कामकाज वाढल्याने त्याचे परिणाम हे दहावी परीक्षेच्या पेपर तपासणीवर होतील, असाही दावा पाटील यांनी केला. भाजप शिक्षक सेलचे अनिल बोरनारे यांनी सावध भूमिका घेत म्हटले, की जे शिक्षक परिक्षेचे कामकाज करत आहेत, आयोगाने त्यांना आणि अपंग शिक्षकांना यातून वगळावे. निवडणुकीचे कामकाज हे राष्ट्रहिताचे कामकाज असल्याने शिक्षकांनी यासाठी अधिकाधिक सहभाग द्यावा, असेही आवाहन त्यांनी केले.