मुंबई Tata Mumbai Marathon २०२४ : १९ वी मुंबई टाटा मॅरेथॉन २१ जानेवारी रोजी होणार असून त्याचे काऊंट डाऊन आजपासून सुरू झाले आहे. यंदा या मॅरेथॉनमध्ये ५९ हजार पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला आहे. देश विदेशातील नामांकित धावक या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आहेत. पोल व्हॉल्टमधील ऑलिम्पिक आणि जागतिक विजेती केटी मून आणि मॅरेथॉन आयकॉन मेब केफ्लेझिधी यांची यंदाच्या मॅरेथॉनसाठी इव्हेंट अम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.
मुंबईची शान मुंबई मॅरेथॉन : आशियातील सर्वात प्रतिष्ठित, सर्वात जास्त बक्षीस राशी, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धकांचा समावेश असणारी टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदा रविवार, २१ जानेवारी रोजी होत असून यंदा प्रथमच ५९,००० हून अधिक स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये धावणार आहेत. यामध्ये पूर्ण मॅरेथॉनमध्ये प्रथमच यंदा ११ हजार स्पर्धकांचा टप्पा ओलांडला गेला आहे. पोल व्हॉल्टमधील ऑलिम्पिक आणि जागतिक विजेती केटी मून आणि मॅरेथॉन आयकॉन मेब केफ्लेझिधी यांची यंदाच्या मॅरेथॉनसाठी इव्हेंट अम्बेसेडर म्हणून उपस्थिती असणार आहे. तसेच यंदा जागतिक अथलेटिक्स गोल्ड लेबल रोड रेसमध्ये आंतरराष्ट्रीय एलिट गटात विजेतेपदासाठी गतविजेते आणि इव्हेंट रेकॉर्ड होल्डर इथिओपियाचा हेली लेमी बेरहानू आणि अॅकियालेम हेमनोट यांच्यासमोर जेतेपद राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे. भारतीय खेळाडूंमध्ये गोपी टी आणि आरती पाटीलकडून अपेक्षा कायम असणार आहेत.
यांच्या समोर असणार आव्हान : २०१७ मध्ये आशियाई मॅरेथॉन जिंकणारा भारताचा पहिला धावपटू ठरलेल्या गोपी टी समोर यंदा २०२० मधील चॅम्पियन श्रीनू बुगाथा आणि २०२३ मधील वसई-विरार महापौर मॅरेथॉन जिंकणारा तीर्थ कुमार पुन यांचे आव्हान असणार आहे. तसेच गतवर्षीची उपविजेती आरती पाटील ही तिच्या पहिल्या पदासाठी उत्सुक असून तिला २०१७ आणि २०१९ मधील उपविजेती जिग्मेट डोल्मा हिच्याकडून कडवी लढत अपेक्षित आहे. एकूण चार लाख पाच हजार यूएस डॉलर इतकी इनामी राशी असलेल्या या मॅरेथॉनमध्ये पूर्ण मॅरेथॉनमधील भारताच्या पुरुष आणि महिला विजेत्यांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस तसेच स्पर्धा विक्रम नोंदवल्यास प्रोत्साहन म्हणून २ लाख रुपयांचे बक्षीस भेटणार आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेली अशी मॅरेथॉन : टाटा सन्सचे ब्रॅड आणि मार्केटिंग प्रमुख एड्रियन टेरॉन म्हणाले, आम्हाला टाटा मुंबई मॅरेथॉनशी जोडल्याचा अभिमान वाटतो. ही स्पर्धा अथलेटिक उत्कृष्टता आणि सामुदायिक भावनेला मूर्त स्वरूप देते. भारतासह जगभरातील ५९,००० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग असलेली टीएमएम २०२४ मानवी सहनशक्ती आणि आत्म्याचे एक उल्लेखनीय प्रदर्शन असेल. उच्चभ्रूपासून ते प्रथमच मॅरेथॉनपटूपर्यंत प्रत्येक सहभागीला, असाधारण यश मिळवण्यासाठी त्यांच्या सीमा ओलांडताना पाहणे खरोखर प्रेरणादायी असेल. आम्ही सर्व सहभागींना शुभेच्छा देतो आणि आशा करतो की, त्यांच्याकडे धावण्याचा यशस्वी आणि संस्मरणीय अनुभव असेल.
५९ हजार पेक्षा जास्त स्पर्धकांनी घेतला भाग : प्रोकॅम इंटरनॅशनलचे जॉईंट एमडी विवेक सिंग म्हणाले की, २००४ पासून सुरू झालेला हा प्रवास एका उंच शिखरावर येऊन ठेपला आहे. यंदाची ही १९ वी मॅरेथॉन असून यंदा ५९ हजार पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतल्याने हा एक विक्रम आहे. मागील सहा महिने टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी अभूतपूर्व ठरले आहेत. कारण आम्ही नोंदणीची संख्या वाढवून नवीन विक्रम केले आहेत. ही फक्त मुंबई किंवा देशापूर्ती मर्यादित मॅरेथॉन नसून आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेली अशी मॅरेथॉन आहे. २००४ च्या दरम्यान देशात फक्त ३ ते ४ मॅरेथॉन आयोजित होत होत्या. परंतु आता त्याची संख्या हजारो पार गेली आहे. ही एक लोकांच्या फिटनेसच्या बाबतीत फार सकारात्मक अशी बाब आहे. देशातील युवा आता फिटनेस बद्दल जागृत झाले आहेत. विशेष म्हणजे मागील २० वर्षात मॅरेथॉनमध्ये महिला वर्गाचा समावेश फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. देशातील नारीशक्ती या क्षेत्रात पुढे आली आहे. मॅरेथॉनसाठी सर्व भागधारकांनी खूप प्रयत्न केले आहेत. यामुळं धावपटू, भागधारक आणि टाटा मुंबई मॅरेथॉनशी संबंधित प्रत्येकासाठी एक अविस्मरणीय प्रवास ठरणार आहे.
मॅरेथॉन आणि मुंबई फेस्टिवल : या मॅरेथॉन विषयी बोलताना राज्याच्या पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव, जयश्री भोज म्हणाल्या की, टाटा मुंबई मॅरेथॉन ही मुंबईची शान असून याची ख्याती जगभरात पसरली आहे. यादरम्यान मुंबईत बहुप्रतीक्षित 'मुंबई फेस्टिव्हल २०२४' चे आयोजन करण्यात आले आहे. एकता, संस्कृती आणि विविधतेचा उत्सव होण्यासाठी मुंबई सज्ज होत आहे. टाटा मुंबई मॅरेथॉन आणि काळा घोडा आर्टस फेस्टिव्हल यांच्या सहकार्याने ९ दिवस चालणारा या फेस्टिव्हलमध्ये लोकप्रिय कार्यक्रमांसह संगीत महोत्सव, एक्स्पो, सिनेमा आणि बीच फेस्ट, चित्रपट स्पर्धा, क्रिकेट क्लिनिक, स्टार्ट-अप यांचा समावेश करण्यात आला आहे.
संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन : मॅरेथॉन दरम्यान सारेगामाचे कलाकार लाईव्ह परफॉर्मन्स करून सर्व स्पर्धकांचा आत्मविश्वास उंचावणार आहेत. यासाठी पोस्ट-फिनिश झोनमध्ये संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यात वर्षा सिंग धनाव, राजा हसन, जान कुमार सानू, डीजे स्वाट्रेक्स, प्रणव चंद्रन, अविनाश गुप्ता, गिरीश चावला, शेरीन आणि डीजे पाब्लो यांसारखे प्रसिद्ध कलाकार बॉलीवूडमधील लोकप्रिय गाण्यांचे सादरीकरण करतील.
हेही वाचा -