मुंबई : राज्यात H3N2 या व्हायरसने हाहाकार माजला असून नागरिकांमध्ये भीतीच वातावरण आहे. विशेष करून या व्हायरसमुळे अहमदनगर मध्ये चद्रकांत सकपाल या २३ वर्षाच्या मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने त्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले आहे, की राज्यामध्ये H1N1 आणि H3N2 याचे ९ मार्च पर्यंत २६९ रुग्ण होते. १२ मार्चला हा आकडा ३५२ वर गेला. म्हणजे नक्कीच यामध्ये वाढ झालेली आहे.
चंद्रकांत सकपाल याचा मृत्यू : H3N2 या आजाराने २३ वर्षीय चंद्रकांत सकपाल याचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात असले तरी अजूनही याबाबत अंतिम अहवाल येणे बाकी आहे. चंद्रकांत सपकाल याच्या मृत्यू विषयी सांगताना तानाजी सावंत म्हणाले की, अहमदनगर, वडगाव येथील डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील या मेडिकल कॉलेजचा चंद्रकांत हा विद्यार्थी होता. परीक्षा संपल्यानंतर तो आपल्या मित्रांसोबत अलीबाग येथे फिरायला गेला होता. त्यानंतर पुन्हा कॅम्पस मध्ये आल्यानंतर त्याला ताप व अंगदुखी जाणवू लागली. दुसऱ्या दिवशी त्यांच्या आई-वडिलांनी त्याला सरकारी रुग्णालयात दाखल केले. परंतु १२ मार्चला त्यांच्या कुटुंबाने त्याला नगरच्या साईदीप या खाजगी रुग्णालयात हलवले. तेथे त्याचा १३ मार्च रोजी रात्री बारा वाजता दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु चंद्रकांत सकपाल याला यापूर्वीसुद्धा कोविड, H3N2 अशा अनेक व्याधी असल्याकारणाने त्याच्या मृत्यूचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमक कारण स्पष्ट होईल.
नागपुरात ७२ वर्षीय इसमाचा मृत्यू : चंद्रकांत सकपाल युवका नंतर H3N2 या आजाराने नागपूरच्या ७२ वर्षीय ए के माझी, या व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे. ९ मार्च २०२३ रोजी या व्यक्तीचा मृत्यू झाला असून चंद्रकांत प्रमाणे यांना सुद्धा अनेक व्याधींची लागण झाली होती. म्हणूनच यांचाही मृत्यूचा अंतिम अहवाल अजून आला नसून तो अहवाल आल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होईल, असं तानाजी सावंत यांनी सांगितल आहे.
H3N2 व्हायरस पसरत आहे? : याबाबत बोलताना आरोग्य मंत्री म्हणाले की, H3N2 या व्हायरस ने थेट मृत्यू होत नाही. योग्यवेळी उपचार घेतले तर हा 2 दिवसांत बरा होतो. आम्ही संपूर्ण राज्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवली आहे. तसेच गरज भासल्यास टॅम्बीफ्लू गोळी देण्यास सांगितले आहे. ज्या ठिकाणी असे संशयित रुग्ण आढळून येतील, त्यावर उपचार केले जातील. परंतु नागरिकांनी
अंगावर आजार काढू नका, खबरदारी घ्या. ताप असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या, असेही आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले आहे.