मुंबई - उत्तर प्रदेशातून हृदयाचा उपचार करण्यासाठी महापालिकेच्या केईएम रुग्णालयात दाखल झालेल्या प्रिन्स राजभर या अडीच महिन्याच्या बालकाचा शुक्रवारी दुर्दैवी मृत्यू झाला. प्रिन्सच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी केली आहे. अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांची भेट घेतली.
हेही वाचा - 'केईएम' रुग्णालयातील 'प्रिन्स' प्रकरणी २५ जणांची चौकशी
उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यातून प्रिन्स राजभर हा अडीच महिन्यांच्या बालक केईएम रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाला होता. रुग्णालयातील बालकांच्या अतिदक्षता विभागात ७ नोव्हेंबरला ईसीजी मशीनमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे लागलेल्या आगीत प्रिन्स गंभीर जखमी झाला होता. त्याचा डावा हात भाजल्यामुळे तो हात शस्त्रक्रिया करून काढून टाकण्यात आला. त्यानंतर त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, शुक्रवारी (22 नोव्हेंबर) प्रिन्सचे हृदय बंद पडले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त करत ही घटना केईएम रुग्णालयासाठी लाजीरवाणी असल्याचे मत अमित ठाकरे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - प्रिन्स मृत्यू प्रकरणाचा पारदर्शक अहवाल सादर करा, स्थायी समितीत अध्यक्षांचे आदेश