मुंबई - नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीतून गळती झाल्याने २२ रुग्णांचा मृत्यू झाला. टँकरमधून ऑक्सिजन टँकमध्ये भरत असताना ही दुर्घटना झाली. या सगळ्या प्रकारावर भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दुःख व्यक्त केले आहे. सरकार ह्या प्रकरणी सर्वस्वी दोषी असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रवीण दरेकरांनी आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क केला आणि या घटनेला जबाबदार असणार्यांवर त्वरित कारवाई करा व भविष्यात तरी काळजी घ्या, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.
नेमकी घटना काय?
सध्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच अनेक रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्यात ऑक्सिजनचा साठा कमी पडत आहेत. मात्र असे असताना दुसरीकडे नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीची घटना घडली आहे. ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या टॅंकरमधून ऑक्सिजन वाहिन्यांमध्ये ऑक्सिजन सोडण्यात येत होता. याच वेळी ऑक्सिजन वॉल लिकेज झाल्याने गळती झाली. दरम्यान या घटनेमुळे आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही काही रुग्ण दगवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे राज्यभरात हळहळ व्यक्त करण्यात येते आहे.
हेही वाचा - केंद्रावर टीका करण्यापेक्षा त्यांचे सहकार्य घ्या -नवनीत राणा यांचा मोलाचा मंत्र
हेही वाचा - महेंद्रसिंह धोनीच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण; रुग्णालयात दाखल