मुंबई - अॅमेझॉन प्राईमच्या 'तांडव' या वेबसिरिजमध्ये देवी-देवतांचा अपमान केल्याचा आरोप आमदार राम कदम यांनी केला आहे. ज्या लोकांनी हिंदू देवी-देवतांचा अपमान केला, त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. जर ४८ तासांत सरकारने कारवाई केली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून पुन्हा आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी यावेळी सरकाराला दिला आहे.
तांडवच्या दिग्दर्शकाविरोधात गुन्हा दाखल -
या मालिकेविरोधात भाजपचे आमदार राम कदम यांनी बीकेसी येथे तर मुंबई भाजपचे सचिव शर्मा यांनी कस्तुरबा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. यावेळी तांडव वेब मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेता यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असल्याचे राम कदम यांनी सांगितले. 'तांडव' या प्रदर्शित झालेल्या वेब मालिकेविरोधात भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले असून खासदार मनोज कोटक यांनीही केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून वेब मालिकेच्या निर्मात्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, 'तांडव' वेबसिरीजविरोधात आंदोलन करताना पोलिसांनी राम कदम यांना मंगळवारी सकाळी ताब्यात घेतले होते.
उत्तर प्रदेशमध्येही दाखल करण्यात आला गुन्हा -
'तांडव' या वेबसीरिजविरोधात उत्तर प्रदेशच्या हझरातगंज पोलीस ठाण्यामध्ये रविवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. हिंदू देवतांना आक्षेपार्ह्यरित्या दाखवण्यात आल्याचा आरोप ठेवत, दिग्दर्शक अली अब्बास जफर आणि लेखक गौरव सोलंकी यांच्याविरोधात हे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आता उत्तर प्रदेश पोलिसांचे एक पथक मुंबईला येणार आहे. यामध्ये अॅमेझॉन प्राईमच्या ओरिजिनल कंटेंट विभागाच्या भारतातील प्रमुख अपर्णा पुरोहित, निर्माते हिमांशू कृष्णा आणि आणखी एका अज्ञाताच्या नावांचाही यात उल्लेख करण्यता आला आहे. यापूर्वी रविवारी माहिती व प्रसारण मंत्रालयाने याप्रकरणी अॅमेझॉन प्राईमच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले होते.
हेही वाचा - पनवेल पालिका क्षेत्रात 11 जणांवर कोरोना लसीचे साईड इफेक्ट; उलटी, तापाची लक्षणे