मुंबई : राजस्थान मधील क्राउडफंडिंग कंपनीच्या ( Crowdfunding Company ) माध्यमातून लहान मुलांमध्ये दुर्मिळ आजारांवर उपचार केले जातात. उपचार करण्यासाठी राष्ट्रीय धोरणा अंतर्गत काम करणाऱ्या एका खाजगी कंपनीने याबाबत जाहीरात केली. जाहिरातीच्या माध्यमातून मुलांच्या उपचाराकरिता मदतनिधी उभारणाऱया केलेल्या जाहिरातीमध्ये लहान मुलांचे फोटो वापरण्यात आले. लहान मुलांचे वापरण्यात आलेल्या फोटो विरोधात पोलीस स्टेशनला कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात दशरथ कांबळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात ( Bombay High Court ) अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला ( Prearrest bail application filed ) होता. कांबळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करताना न्यायालयाने म्हटले की, वैद्यकीय उपचारासाठी मदतनिधी उभारणाऱया स्वयंसेवी संस्थेवर कारवाईचा बडगा उगारणाऱया राज्य सरकारला आणि पोलिसांना फटकारत ज्या स्वयंसेवी संस्था विधायक कामे करत आहे, त्यांच्यावरही तुम्ही संशय कसा घेता? असा प्रश्न पोलिसांना उच्च न्यायालयाने विचारला आहे.
संशयाने बघण्याऐवजी सत्कार्यामध्ये मदत करा : न्यायालयाने म्हटले की त्यांच्याकडे संशयाने बघण्याऐवजी त्यांच्या सत्कार्यामध्ये मदत करा. ज्या दुर्गम भागात शासकीय वैद्यकीय सेवा पोहोचलेल्या नाहीत त्या भागातील गरजूंना मदत करणाऱया स्वयंसेवी संस्थांची कदर करा असा कडक डोस पाजत न्यायालयाने राज्य सरकार व महाराष्ट्र पोलिसांना फटकारले आहे. राज्य सरकारचे महत्त्वाचे अंग असलेल्या पोलीस खात्याने स्वयंसेवी संस्थांच्या कार्याची कदर केली पाहिजे. शक्य असेल तर अशा संस्थांचे विधायक काम पुढे नेण्यासाठी हातभार लावला पाहिजे. आपल्या राज्यात असे अनेक दुर्गम भाग आहेत ज्या ठिकाणी अशा संस्था कार्य करताहेत. या प्रकरणातील संस्थेने अनेक गरजू मुलांच्या शस्त्रक्रियेवरील खर्च उभारणीसाठी मदत केलेली आहे. क्राऊडफंडिंगच्या माध्यमातून हे पैसे उभे केले आहेत. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
दशरथ कांबळे सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर : गरजू रुग्णांच्या मदतीसाठी द लिटिल शाईन फाऊंडेशन ही स्वयंसेवी संस्था चालवणारे दशरथ अर्जुन कांबळे यांना न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला. याचवेळी न्यायमूर्तींनी राज्य सरकार आणि पोलिसांच्या दृष्टिकोनावर ताशेरे ओढले. कांबळे यांनी वकील शंभू झा यांच्यामार्फत उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. त्यांच्याविरोधात 8 जून रोजी आचोळे पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून अटक केली जाण्याच्या भीतीने दशरथ कांबळे यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. दोन लहान मुलांवर हृदय शस्त्रक्रिया करायची असल्याचे सांगून कॉल सेंटरच्या माध्यमातून पैसे गोळा केल्याचा आरोप करीत कांबळे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीस अधिकार्यानेच ही तक्रार दाखल केली होती. सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार दशरथ कांबळे यांच्या संस्थेच्या आवारात टाकलेल्या छाप्यात मोबाईल तसेच इतर वस्तू जप्त केल्या होत्या. तथापि न्यायमूर्तींनी या प्रकरणात दशरथ कांबळे यांच्या कोठडीची गरज नाही. अशा प्रकारच्या संस्थांवर संशयाने बघण्याऐवजी त्यांच्या चांगल्या कार्यात मदत करा असा कान पिचकी देत राज्य सरकार आणि पोलिसांना फटकारले आहे. दशरथ कांबळे यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला.