मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आज आपल्या वांद्रे येथील घरात आत्महत्या केली. त्याचा मृतदेह पोलिसांनी महानगरपालिकेच्या कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन आज रात्री उशिरा पूर्ण होईल, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, सध्याची कोरोना संसर्गाची स्थिती पाहता रुग्णालय परिसरामध्ये चाहत्यांनी गर्दी करु नये, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
'पवित्र रिश्ता' या हिंदी मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहचला होता. त्यानंतर त्याने काय पो छे, एम एस धोनी-द अनटोल्ड स्टोरी, केदारनाथ, छिछोरे या चित्रपटांती भूमिका गाजवल्या. त्याने आज आत्महत्या केली. सुशांतचा मृतदेह आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विलेपार्ले स्थित कूपर रुग्णालयात आणण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतदेहाची तपासणी करून सुशांत सिंह राजपूतला य मृत घोषित केले होते.
त्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करून मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. कूपर रुग्णालय परिसरामध्येच असलेल्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या अखत्यारीतील कूपर शवविच्छेदन केंद्र (पोस्टमार्टेम सेंटर) येथे शवविच्छेदनाची पुढील कार्यवाही सुरू आहे. आज रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे पालिकेने कळवले आहे.