मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी मुबंई पोलिसांचा तपास संशयास्पद असून, त्याने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचा गौप्यस्फोट भाजप खासदार नारायण राणेंनी केला आहे. सुशांतचा शवविच्छेदन अहवाल आमच्याकडे असून तो योग्य वेळी न्यायालयात सादर करू असाही दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला. भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांच्या चौकशीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सुशांतसिंहची आत्महत्या नसून हत्या करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी राज्य सरकार गुन्हेगाराला वाचवण्याचे काम करत असल्याचा आरोप खासदार नारायण राणे यांनी केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास संशयास्पद असल्याचेही ते म्हणाले. बिहारवरून आलेल्या पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाइन करण्यात आल्याची महापालिकेची भूमिकाही संशयास्पद असून राज्य सरकार काही लोकांना वाचविण्यासाठी चौकशी टाळत असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, सुशांतची माजी व्यवस्थापक असलेल्या दिशा सालियानचा बलात्कार करून खून करण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. याप्रकरणी तिच्या कुटुंबीयांवर दबाव टाकला जात असून याप्रकरणीही सरकार आरोपीला वाचवत असल्याचे ते म्हणाले.
रियाऐवजी राणेंनी घेतले सेनेच्या 'या' खासदारांचे नाव -
सुशांतसिंह याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील अनेकांची चौकशी झाली आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस सखोल चौकशी करत आहे. यात आता सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्ती हिच्या नावाचाही उल्लेख आला आहे. नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत रियाऐवजी शिवसेना खासदार प्रिया चतुर्वेदी यांच्या नावाचा उल्लेख केला. राणे यांनी खासदार चतुर्वेदी यांचा एकदा नाही तर तीनवेळा उल्लेख केला. मात्र, त्यांना स्वतःची चूक लक्षात आली आणि त्यांनीच स्पष्ट केले की प्रिया या खासदार आहेत आणि त्यानंतर त्यांनी सुशांत प्रकरणातील रियाचे योग्य नाव उच्चारले.
खासदार चतुर्वेदी - वरुण यांनी माफी मागावी
अमृता फडणवीस यांच्या ट्विटवर शिवसेनेकडून टीका करण्यात आली होती. शिवसेनेच्या खासदार प्रिया चतुर्वेदी आणि युवासेनेचे वरुण सरदेसाई यांनी अमृता फडणवीस यांना ज्या पोलीस प्रशासनाकडून संरक्षण घेता त्यांच्यावर टीका करता, असा टोला लगावला होता. त्यावर वरुण यांना अमृता यांच्यावर टीका करण्याचा काय अधिकार आहे, असा सवाल राणेंनी केला. मोठ्या व्यक्तींना पोलीस स्वतः संरक्षण देत असतात असे राणे म्हणाले. खासदार चतुर्वेदी या महिला असून, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात बोलण्याऐवजी माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर टीका करत आहेत, असे सांगून राणेंनी त्यांना महिलांची बाजू मांडण्याचा सल्ला दिला. खासदार चतुर्वेदी आणि वरुण सरदेसाई यांनी अमृता यांची माफी मागावी अन्यथा तोंड कसे बंद करतात ते आम्हाला माहित आहे, असेही राणे म्हणाले. त्यामुळे या दोघांनीही त्यांची माफी मागावी असे नारायण राणे यावेळी म्हणाले.
कोकणात जाण्यासाठी ई-पासची अट काढून टाका
गणेशोत्सव हा कोकणवासियांचा महत्त्वाचा सण आहे. आवडत्या गणरायाच्या उत्सवाला जाण्यासाठी कोकणवासियांना ई-पास काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही अट काढून टाकण्याची मागणी राणेंनी केली.
आठ बाय आठ खोलीतून १२ कोटी जनतेचा कारभार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळून राणेंनी आठ बाय आठच्या खोलीत बसून १२ कोटी जनतेचा कारभार चालला असल्याची टीका केली. खोलीत बसूनच कारभार करायचा आहे तर मंत्रालय आणि मोठमोठी कार्यालये हवीत कशाला? असाही उपरोधिक सवाल राणेंनी उपस्थित केला. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे राज्यभर फिरून जनतेच्या अडचणी समजून घेत आहेत. त्यांना मदत करण्याऐवजी सरकार त्यांना अडकाठी आणत आहे, असेही राणे म्हणाले.