मुंबई - देशातली अग्रगण्य बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेला तब्बल 14 हजार कोटी रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या निरव मोदीची ईडीकडून (सक्तवसुली संचलनालय) जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचा लिलाव करण्यात येत आहे. याचाच भाग असलेल्या नीरव मोदीच्या मालकीच्या दुर्मिळ अशा पेंटिंगसचा लिलाव करण्यात येऊ नये, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली असता ती फेटाळण्यात आली आहे.
हेही वाचा - 'कॅग' अहवालावरून आज विधानसभेत राडा होण्याची शक्यता
नीरव मोदीचा मुलगा रोहीण मोदी याने बुधवारी उच्च न्यायालयात याचिका केली होती. ही सुनावणी मुख्य न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी व न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठासमोर झाली असता न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत 5 मार्च रोजी होणाऱ्या लिलावावर स्थगिती देण्यास मनाई केली आहे. फरार आरोपी नीरव मोदी याच्या मुलाचे रोहीण ट्रस्ट नावाचे ट्रस्ट असून यात आपणही पदावर असल्याने लिलाव करण्यात येणाऱ्या दुर्मिळ पेंटींग्सचा लाभ कायद्याने मलाही मिळू शकतो. त्यामुळे न्यायालयाने यावर स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, ईडीकडून या अगोदरच पैसे वसूल करण्यासाठी जप्त मालमत्तेचा लिलाव सुरू असून यात कुठलीही स्थगिती देता येणार नसल्याचे सांगत न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.
हेही वाचा - कोरोना विषाणूची दहशत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा खेळणार नाही होळी