मुंबई Sunil Gavaskar : क्रिकेट प्रशिक्षक विलास गोडबोले यांच्या क्रिकेटमधील प्रशिक्षक कारकीर्दीला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर या पाच दशकांतील प्रवास, क्रिकेट प्रशिक्षण, महत्त्वाच्या घटना, किस्से आणि विविध आठवणी यावर आधारित 'क्रिकेट कोचिंग अँड बियॉन्ड' हे पुस्तक विलास गोडबोले आणि सहलेखक अमित गडकरी यांनी लिहिलंय. पुस्तकाचं प्रकाशन रविवारी (3 डिसेंबर) भारताचे माजी कर्णधार व फलंदाज 'लिटीलमास्टर' सुनील गावसकर, माजी कसोटीपटू संजय मांजरेकर, माजी कसोटीपटू राजू कुलकर्णी, बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे, मुंबई क्रिकेटचे माजी कॅप्टन शिशिर हट्टंगडी आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष रत्नाकर शेट्टी यांच्या हस्ते पार पडले.
प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे उत्तम क्रिकेटपटू घडतात : पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना दिग्गज क्रिकेटपटूंनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी प्रशिक्षक विलास गोडबोले यांच्याबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, चांगला क्रिकेटपटू म्हणून घडण्यासाठी जशी क्रिकेटपटूला मेहनत घ्यावी लागते, तशीच मेहनत त्याच्या प्रशिक्षकालाही घ्यावी लागते. त्यामुळं प्रशिक्षकांच्या चांगल्या मार्गदर्शनामुळं उत्तम क्रिकेटपटू घडतो, असं गावसकर म्हणाले.
"माझ्या कारकिर्दीमध्ये जेव्हा माझी कामगिरी चांगली होत नव्हती. तेव्हा मला विलास गोडबोले सरांनी मोलाच्या टिप्स दिल्या. त्यामुळं मी पेटून उठलो आणि चांगली कामगिरी केली, त्यामुळं मला नेहमीच विलास सरांकडून प्रेरणा मिळालीय"- माजी कसोटीपटू संजय मांजरेकर
दिग्गजांसमोर बोलताना दडपण : यावेळी भाजपाचे नेते आणि बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार म्हणाले की, आज एकीकडं तीन राज्यांमध्ये भाजपाला चांगलं यश मिळालंय. त्यामुळं मी आनंदित आहे. तर दुसरीकडं विलास गोडबोले सरांच्या क्रिकेट प्रशिक्षक कारकीर्दीला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. याचाही मला आनंद होतोय. मात्र, व्यासपीठावर दिग्गज लोक बसले असताना काय बोलावं, हे कळत नाहीय. एकीकडं मी आज आनंदी आहे. तर दुसरीकडं काय बोलावं याचं थोडंफार दडपण आल्याचंही ते म्हणाले.
- या कार्यक्रमाला माजी क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी, संजय बांगर, जयंतीला केनिया, वृंदा भगत हेदेखील उपस्थित होते
हेही वाचा -