मुंबई - कोरोनापासून बचाव करण्यासाठी वाफ, गरम पाणी, आयुर्वेदिक काढे घेतले जात असून त्यात गोमूत्र वापराचीही भर पडली आहे. अशात आता 'दारूचा काढा' कोरोनातून बरे करत असल्याचा दावा अहमदनगरमधील बोधेगावातील एका डॉक्टरने केला आहे. आतापर्यंत आपण 50 गंभीर रुग्णांना दारूचा काढा देत बरे केल्याचा दावा या डॉक्टरचा आहे. यासंबंधीच्या बातम्या आणि एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे लोकांमध्ये चुकीची माहिती जाण्याची शक्यता लक्षात घेता आणि या डॉक्टरांकडून लोकांची महामारीच्या काळात दिशाभूल केली जात असल्याचे म्हणत, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी सुमोटो घेत या डॉक्टरविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे. तर दुसरीकडे इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनीही या दाव्यावर आक्षेप घेत या डॉक्टरविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे.
कोरोनावर अजूनही औषध सापडलेले नाही. जगभरातील शास्त्रज्ञ औषध तयार करण्या मागे लागले आहेत. असे असताना आता बोधेगाव, अहमदनगरमधील सिताई रुग्णालयातील डॉ. अरुण भिसे नावाच्या डॉक्टरने अजब दावा करत आणखी एका गैरसमजाची चुकीच्या माहितीची भर पाडली आहे. ऑक्सिजनची पातळी कमी झालेल्या, एचआरटीसी स्कोर जास्त असलेल्या रुग्णांना देशी दारूचा काढा अर्थात 30 एमएलची मात्रा सकाळ संध्याकाळ दिली असता रुग्ण बरे झाले, असे 50 रुग्ण आपण बरे केले असून अजूनही काही रुग्ण उपचार घेत असल्याचे या डॉक्टरने आपल्या एका ऑडिओ क्लिपमध्ये सांगितले आहे. ही क्लिप आणि यासंबंधीच्या बातम्या आता सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत.
कारवाईचा बडगा
देशी दारूचा काढा देत रुग्ण बरे करण्याचा हा दावा आता या डॉक्टरला चांगलाच महागात पडणार आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी सुमोटो घेत आता या डॉक्टराविरोधात नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे डॉ. उत्तुरे यांनी सांगितले आहे. हे प्रकरण व्यवस्थित माहिती करून घेतले जात असून संबंधित डॉक्टरची माहिती घेतली जात आहे. हा डॉक्टर कुठल्या पॅथीत काम करतो हे तपासून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. जर तो अलोपॅथी डॉक्टर असेल तर आम्ही त्याला नोटीस बजावत त्याची नोंदणी रद्द करण्याची कारवाई करू, तर तो आयुर्वेदिक, होमिओपॅथी डॉक्टर असेल तर आयुष कौन्सिलकडे या डॉक्टरविरोधात कारवाईची मागणी करू, असेही डॉ. उत्तुरे यांनी सांगितले आहे.
'कडक कारवाई करा'
देशी दारूचा काढ्यासारखी कोणतीही उपचारपद्धती आधुनिक वैद्यकशास्त्रात, आयुर्वेदात वा कुठल्याही पॅथीत नाही. त्यामुळे एका डॉक्टरने असे चुकीचे दावे करणे गंभीर आहे. याला नागरिकांनी बळी पडू नये, असे अवाहन डॉ. भोंडवे यांनी केले आहे. आपल्याकडे योग्य ती उपचार पद्धती वापरली जात आहे. तेव्हा अशा दिशाभूल करणाऱ्याकडे दुर्लक्ष करा, असे सांगतानाच डॉ. भोंडवे यांनी या डॉक्टरविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
'..तर मृत्यू होतो'
कोरोनाच्या विषाणूला साबण आणि सॅनिटायझर काही सेकेंदात मारून टाकते. सनिटायझरमध्ये 70 ते 90 टक्के अल्कोहोल (दारू) असते. इतक्या प्रमाणात अल्कोहोल असेल तरच ते विषाणू मरतात. तेव्हा रुग्ण शरीरात 70 ते 90 टक्के अल्कोहोल घेणार का? हे शक्य आहे का? असे झाल्यास ती व्यक्ती तिथल्या तिथे मरेल, असे तज्ज्ञाकडून सांगितले जात आहे. कारण देशी दारू अर्थात मद्यात काही प्रमाणातच अगदी कमी टक्के अल्कोहोल असते. तर रक्तात 0.03 टक्केच अल्कोहोल सामावून घेतले जाते. ते जर 0.04 टक्के झाले तर मृत्यू होतो. तेव्हा 70 ते 90 टक्के अल्कोहोल घेणे शक्यच नाही. राहिला डॉ. भिसेचा दावा तर हा दावा साफ चुकीचा आहे. मुळात हा डॉक्टर सर्वसामान्य रुग्णालयात काम करत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्याच्याकडे गंभीर रुग्ण येण्याचा प्रश्नच येत नाही. तर लक्षणे नसलेले, माईल्ड रुग्ण सद्या औषधोपचारावर बरे होत आहे. तेव्हा 30 एमएल दारू देत रुग्ण बरे केल्याचा दावा खोटा आहे असेही तज्ज्ञांनी सांगितले आहे.
'तो' डॉक्टर 'नॉट रिचेबल'
बोधेगावमधील ज्या डॉक्टरने हा दावा केला आहे, त्या डॉक्टरशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न 'ईटीव्ही भारत'ने केला. परंतु डॉक्टरचा फोन नॉट रिचेबल येत आहे. त्यामुळे या डॉक्टरची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. दरम्यान या डॉक्टरला अहमदनगरच्या आरोग्य विभागाकडून नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे. तर आता महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडूनही कडक कारवाई होणार आहे.
हेही वाचा -नाशिकमध्ये पहाटेपासून रांगेत लागूनही मिळत नाही लस, ज्येष्ठ नागरिकांकडून नाराजी