मुंबई Summon To MLA Ravindra Waikar: भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानुसार, ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी महापालिकेच्या जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडलगत असलेल्या उद्यानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर पंचतारांकित हॉटेल बांधण्यास मंजुरी मिळवली. आमदार रविंद्र वायकर यांनी या जमिनीवर मातोश्री क्लब उभारला. याच जागेतील क्रीडांगण आणि उद्यानासाठी आरक्षित दोन लाख चौरस फूट जागा ताब्यात घेऊन येथे 'मातोश्री' नावाने पंचतारांकित हॉटेल उभारण्यात येत आहे. याकामी वायकरांनी 500 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
आरक्षित जमीन व्यावसायिक कारणासाठी वापरली: रविंद्र वायकर यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेची दिशाभूल केल्याप्रकरणी आणि जानेवारी ते जुलै 2021 दरम्यान बेकायदेशीरपणे आलिशान हॉटेल बांधण्यासाठी फसवणूक करून परवानगी मिळवल्याबद्दल त्यांच्या आणि इतरांविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्यात त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडला लागून असलेली ही जमीन क्रीडा आणि मनोरंजनासाठी राखीव होती आणि ती वायकर आणि इतरांना सार्वजनिक वापरासाठी देण्यात आली होती; परंतु त्यांनी ती व्यावसायिक कारणांसाठी वापरून करोडो रुपये कमावले, असे 'एफआयआर'मध्ये नमूद आहे. महापालिकेच्या अभियंत्याच्या तक्रारीवरून सप्टेंबरमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 120 बी, 406, 420 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला होता. याच गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
वायकरांच्या पत्नीविरुद्धही गुन्हा दाखल: बृहन्मुंबई महानगरपालिकेसोबतच्या कराराचे उल्लंघन करून जोगेश्वरी येथे आलिशान हॉटेल बांधल्याचा आरोप करत आर्थिक गुन्हे शाखेनं आमदार रवींद्र वायकर (शिवसेना ठाकरे गट) आणि त्यांच्या पत्नीसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल यापूर्वी करण्यात आला आहे. 14 सप्टेंबरला आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. महापालिकेचे अभियंता संतोष मांडवकर यांच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल करण्यात आलाय.
क्रीडा सुविधेसाठी परवानगी : या प्रकरणात रवींद्र वायकर, त्यांची पत्नी मनीषा वायकर, व्यवसाय भागीदार आसू नेहलवाई, राज लालचंदानी, पृथ्वीपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरुण दुबे यांच्याविरुद्ध फसवणूक केल्याच्या आरोपांचा समावेश आहे. तक्रारीनुसार, वायकर यांनी जोगेश्वरी भूखंडावर क्रीडा सुविधा चालवण्याची परवानगी मिळवली होती. त्याबाबत महापालिकेशी करार केला होता. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात ही परवानगी देण्यात आली होती.
500 कोटींचा घोटाळा: रवींद्र वायकर यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेसोबत केलेल्या कराराचं उल्लंघन केलं. आरक्षित भूखंडावर हा क्लब आणि आलिशान हॉटेल बांधल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी केलाय. हा 500 कोटींचा घोटाळा असल्याचा दावा सोमैया यांनी केलाय. सोमैया यांच्या तक्रारीच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक चौकशी सुरू केली. वायकर यांना चौकशीसाठी बोलावले होते. रवींद्र वायकर हे आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर झाले होते. आता त्यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
हेही वाचा:
- Case Against MLA Ravindra Waikar Wife : अलिशान हॉटेलच्या बांधकाम प्रकरणी आमदार रवींद्र वायकर यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल
- Kirit Somaiya on Ravindra Waikar: पंचतारांकित हॉटेल घोटाळ्याप्रकरणी उद्धव ठाकरेंचीही चौकशी करा- किरीट सोमैया
- Land Scam Case : 500 कोटींचा कथित भूखंड घोटाळा प्रकरण; ठाकरे गटाच्या नेत्याची कसून चौकशी