मुंबई : काश्मिरी पंडित यांच्या समस्येवर आधारित काश्मिरी फाईल या चित्रपटाला बऱ्यापैकी यश मिळाले. त्यानंतर आता केरळमधील 32 महिलांच्या बेपत्ता होण्यावर आधारित असलेला 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. केरळ स्टोरी या चित्रपटाला करमुक्त करावी, अशी मागणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी तो करमुक्त व्हावा, अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
करमुक्त करण्याचा विचार : या संदर्भात हा विषय आता सांस्कृतिक विभागाच्या अधिकारात येत नाही. मात्र वित्त विभागाच्या माध्यमातून एसजीएसटी करातून नऊ टक्के सूट देता येऊ शकते. यापूर्वी काही चित्रपटांना अशी सूट दिली आहे. त्यामुळे अशी सूट या चित्रपटाला दिली जावी, यासाठी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून विनंती करणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. चित्रपट करमुक्त करण्याचा विचार सुरू आहे, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र शाहीर सुद्धा करमुक्त करणार : दरम्यान केदार शिंदे निर्मित महाराष्ट्र शाहीर हा शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट असणार आहे. शाहीर साबळे यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठे योगदान होते. त्यामुळे हा चित्रपट करमुक्त करण्यासाठी केदार शिंदे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे विनंती केली. उदय सामंत हे शिंदे यांना येऊन आपल्याकडे आले असता हा चित्रपट सुद्धा करमुक्त करण्यासाठी आपण वित्त मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करणार आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. या दोन्ही चित्रपटांविषयी सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 'महाराष्ट्र शाहीर' शाहीर हा साबळे यांच्या जीवनावरील चित्रपट आहे. त्यांचे नातू केदार शिंदे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. महाराष्ट्र शाहीर बायोपिक हा चित्रपट म्हणजे त्यांनी आजोबांना वाहिलेली श्रद्धांजली आहे.