मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी संध्याकाळी भाजपच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना, कुठल्याही क्षणी गोड बातमी येईल, महाराष्ट्रात शिवसेना-भाजप महायुतीचेच सरकार स्थापन होईल, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
दरम्यान, सत्ता स्थापनेसाठी भाजपकडे बहुमत नाही. तसेच शिवसेनाही मुख्यमंत्रिपदावर अडून बसली आहे. त्यामुळे दोनही पक्षाचे नेते यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्र सत्ता स्थापनेवर लागले आहे.
हेही वाचा - 'देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री, महायुती करणार सत्ता स्थापन'
शिवसेनेच्या प्रस्तावासाठी भाजपची दारे २४ तास खुली आहेत, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. मात्र, शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे देखील पाटलांनी यावेळी सांगितले. आम्ही लवकरात-लवकर सरकार स्थापन करू, देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होणार, असा विश्वासही पाटलांनी व्यक्त केला.
हेही वाचा - ...आता शरद पवार काय करणार? संपूर्ण राज्याचे लक्ष
सेनेला 2 नोव्हेंबरला सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिला आहे. त्यांना हवे असेल तर परत प्रस्ताव देऊ. उद्यापासून सरकारचे काम नियमित सुरू होईल. भाजपचे सर्व मंत्री ओल्या दुष्काळाबाबत बैठकीत सहभागी होतील, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.