मुंबई - दादर येथील सानेगुरुजी विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी इकोफ्रेंडली गणपती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत एकूण 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी आपल्या लहानग्या बोटांनी सुंदर, देखणे आणि पर्यावरणपूरक असे गणेशाचे रूप या चिमुकल्यांनी साकारले.
या कार्यशाळेत मुलांना गणेश मूर्तीचा आकार तयार करण्यास देखील शिकविण्यात आले. आयेजकांनी इकोफ्रेंडली गणपतीचे महत्वदेखील विद्यार्थ्यांना पटवून दिले. प्लास्टर ऑफ पॅरीस, थर्माकोल, प्लास्टिक यामुळे पर्यावरणाची हानी होते. शाडूच्या मातीपासून गणपतीची मूर्ती बनवल्याने पर्यावरणाची हानी होणार नाही. मुलांना याची जाणीव करून देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे शाळेचे सचिव मोहन मोहाडीकर यांनी यावेळी सांगितले.