मुंबई - कोरोनामुळे राज्य सामायिक परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) अनेक अभ्यासक्रमांच्या सामायिक प्रवेश परीक्षा आणि त्यांचे शुल्क भरण्यास विलंब झाला होता, त्यांना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शुल्क न भरल्याने परीक्षेसाठी अडचणीत सापडलेल्या तब्बल ७ हजार विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
कोरोनामुळे सीईटी सेलने मार्च महिन्यात अनेक सामायिक प्रवेश परीक्षा आणि त्यांचा कार्यक्रम पुढे ढकलला होता. त्यातच अनेक विद्यार्थ्यांना या प्रवेश परीक्षेसाठी शुल्क भरण्याची मुदत असतानाही कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शुल्क भरता आले नव्हते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अर्ज पूर्ण करण्याची पुन्हा संधी सीईटी सेलने दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अर्जाचे शुल्क भरले नाही अशा विद्यार्थ्यांना अखेरची संधी दिली असून 23 मेपर्यंत रक्कम भरता येणार आहे.
अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी होणारी एमएचटी सीईटीही पुढे ढकलली आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनाकडून होत होती. ज्या विद्यार्थ्यांनी 7 मार्चपर्यंत अपूर्ण अर्ज भरले होते. अशा 6 हजार 418 विद्यार्थ्यांना आता अर्ज पूर्ण भरून शुल्क भरण्याची संधी मिळणार आहे. ही मुदत येत्या 23 मेपर्यंत असणार आहे.