मुंबई - जेएनयू हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी मुंबईतील अनेक महाविद्यालये आणि संस्था एकत्र आल्या आहेत. मध्यरात्री 12 वाजेपासून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. गुंडांवर कारवाई करण्याची मागणीही या संस्थांनी केली आहे. गेट वे ऑफ इंडिया येथे हे आंदोलन होत आहे. विद्यार्थ्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराबद्दल मुंबईकरांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
हेही वाचा - नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छता निरीक्षकांचे निलंबन मागे
या आंदोलनाचे नेतृत्व जेएनयू विद्यार्थी नेता उमर खालिद याने केले आहे. केंद्र सरकारकडून विद्यार्थ्यांची मुस्कटदाबी केली जात आहे. बजरंग दल, एबीव्हीपीच्या गुंडांकडून जेएनयू विद्यार्थ्यांना मारहाण केली गेली आहे, असा आरोप उमर खालिद याने केला आहे.
हेही वाचा - आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली रेसिंग कार टेकफेस्टच्या प्रदर्शनात
या मारहाणीत जखमी झालेल्या 15 जणांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. यातील 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याचा आरोपही खालिद यांनी केला आहे. जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांचे वाढीव शुल्कासंदर्भात गेल्या 3 महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन दाबण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून मुस्कटदाबी केला जात असल्याचाही खालिद याने केला आहे. दरम्यान, मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ रात्रभर बसून जेएनयू समर्थक विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. अद्यापही आंदोलन सुरू ठेवण्याचा निश्चय या विद्यार्थ्यांनी केला आहे.