मुंबई - आज जागतिक महिला दिन जगभर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या दिवशी गृहिणींपासून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या कामाचा गौरव केला जातो, त्याचं कौतुक केलं जातं. तेव्हा असंच कौतुक करावं असं काम आरेतील जंगलात आदिवासी पाड्यात राहणारी एक आदिवासी महिला मागील सहा करत आहे. निसर्ग हा आमचा मायबाप आहे आणि आमच्या या मायबापाच्या जिवावर जर कुणी उठत असेल तर ते आम्ही कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही असं म्हणत या महिलेने 'आरे बचाव' आधी हाक दिली. आरे, जंगल वाचवण्यासाठी ही महिला प्रसंगी तुरुंगात ही गेली, तिच्यावर गुन्हाही दाखल झाला. पण ती काही डगमगली नाही. उलट मेट्रो कारशेड आणि इतर प्रकल्प आरे जंगलातून हद्दपार करण्यासाठी आणखी खंबीर होत ती लढा देत आहे. तर या अशा लढवय्या आदिवासी महिलेचं नाव आहे प्रमिला भोईर. आज जागतिक दिन जंगल वाचवण्यासाठीचा त्यांची लढाई कशी सुरू आहे याची ही कहाणी.
माणूस म्हणूनी जगण्यासाठी आम्हाला सारं करायचं...
आरे बचाव आंदोलनाशी प्रमिला भोईर जोडल्या गेल्या आहेत, पण इतकीच त्यांची ओळख नाही तर आज त्या आदिवासीयांच्या न्याय हक्कासाठी ही लढत आहेत. आदिवासी हक्क संवर्धन समितीच्या माध्यमातून त्या पाड्यात वीज, पाणी, रस्ते, शौचालय अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काम करत आहेत. आमच्या पिढ्यान पिढ्या अंधारात जन्माला आल्या, आयुष्यभर तहानलेल्या राहिल्या. पण आता आमची नवीन पिढी मुख्य प्रवाहात येऊ पाहत आहे, ती शिक्षित होत आहे, त्यांना विविध क्षेत्रात मोठ होताना आम्हाला पाहायचं आहे. पण हे करण्यासाठी आम्हाला वीज, पाणी अशा मूलभूत सुविधा हव्या आहेत. मुंबईसारख्या मोठ्या शहरात आमचे पाडे असताना आम्ही आज ही अंधारात आहोत, तहानलेले आहोत. वीज, पाणी यावी यासाठी आम्हाला 2021 मध्ये ही संघर्ष करावा लागत असल्याची खंत त्या व्यक्त करतात. तर आदिवासीयांच्या अनेक छोट्या मोठ्या समस्या असून मुळात आम्हाला माणूस म्हणून आज ही मुख्य प्रवाहातील समाज आमच्याकडे बघत नाही. आम्हाला कोणताही धर्म नाही, जात नाही. आमचा धर्म एकच माणूस धर्म. तर हे जंगलचं आमचं सर्वस्व. तेव्हा हे जंगल, आमचं अस्तित्व अबाधित राखण्यासाठी मला यापुढे ही लढावं लागलं, तुरुंगात जावं लागलं तरी माझी तयारी आहे असं ही त्या सांगतात. शेवटी प्रमिला भोईर यांचे पती प्रकाश भोईर यांच्या शब्दात सांगायचं झालं तर म्हणावं लागेल, "माणूस म्हणूनी जगण्यासाठी आम्हाला सारं करायचं
आज नाय उद्याला मरायचं
मग कशाला मागं सरायचं!"
म्हणजेच मरणाला न घाबरता, कुठल्याही परिस्थितीला ना घाबरता प्रमिला भोईर आणि त्यांच्या समाजाचा जंगल वाचवण्यासाठीचा तसेच आदिवासीयांच्या न्याय हक्कासाठीचा लढा असाच अविरत सुरू राहणार आहे. तेव्हा आजच्या जागतिक महिला दिनी त्यांना 'ईटीव्ही भारत'कडून शुभेच्छा देत त्यांचा हा लढा यशस्वी होवो याच सदिच्छा व्यक्त करू.