मुंबई 26/11 Terrorist Attack : 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यादरम्यान माझ्या हाताला गोळी लागली होती. मला तो दिवसही अजूनही आठवतो. या घटनेमुळं माझ्या अंगावर आजही काटा येतो असं अनिल निर्मळ यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलंय. 26/11 चा दिवस मी कधीही विसरू शकणार नाही अशी आठवण अनिल निर्मळ यांनी सांगितली.
15 वर्षांपूर्वीच्या त्या रात्री दहा हल्लेखोर समुद्रमार्गे मुंबईत घुसले होते. दोन पंचतारांकित हॉटेल, एक गजबजलेले कॅफे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नरिमन हाऊस या ठिकाणी त्यांनी हल्ला केला. त्यावेळी अनिल निर्मळ कॅमेरामन म्हणून काम करत होते. ईटीव्हीला अनेक वर्षे पुण्यामध्ये कॅमेरामन म्हणून काम केल्यानंतर त्यांना मुंबई कॅमेरामन म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे ते मुंबईत आले होते. मुंबईत आल्यानंतर अनिल निर्मळ त्यांच्या मित्रांसोबत पेईंग गेस्ट म्हणून मुंबईत राहत होते. त्यांचे आई वडील पुण्याला राहत होते.
26/11 च्या रात्री नेहमीप्रमाणे काम संपल्यानंतर अनिल आपल्या रूमवर पोहोचले होते. मात्र काही वेळातच ऑफिसमधून त्यांना फोन आला. सीएसएमटीवर हल्ला झाल्याची त्यांना माहिती मिळाली होती. फोनवरून अनिल यांना ऑफिसला येण्यास सांगण्यात आलं होतं. त्यानंतर अनिल निर्मळ ऑफिसला जाण्यासाठी निघाले. ऑफिसला पोहोचल्यावर त्यांनी आपला कॅमेरा घेऊन सीएसएमटीजवळील मेट्रो सिनेमाजवळ गाठलं. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांनी बॅरिकेट्स लावले होते.
काही वेळात तिथून एक पोलिसांची व्हॅन आली. काही वेळ थांबल्यानंतर त्यातून अचानक गोळीबार सुरू झाला. त्यातील एक गोळी अनिल यांच्या हाताच्या बोटांना चाटून गेली. अनिल निर्मळ यांना काही कळायच्या आतच त्यांच्या हातातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला होता. त्यानंतर निर्मळ यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. तरी देखील त्यांनी धीर न सोडता माध्यमात काम करणं सुरुच ठेवलं. 26/11 च्या हल्लायतून सावरल्यानंतर अनिल आजही माध्यमांत काम करत आहेत. त्यांनी आज पुन्हा 26/11 हल्ल्याच्या आठवणीला उजाळा दिला आहे.
हेही वाचा -