मुंबई - 'रहने को घर नहीं, सोने को बिस्तर नहीं, अपना खुदा है रखवाला, अब तक उसी ने है पाला..' हे 'सडक' या हिंदी सिनेमातील एका 74 वर्षांच्या ज्येष्ठ रिक्षावाल्याच्या बाबतीत खरे ठरले आहे. या वयातही ही व्यक्ती स्वतःच्या आणि कुटुंबांच्या पोटा-पाण्यासाठी तसेच, नातवंडांच्या शिक्षणासाठी दिवस-रात्र धडपड करत आहे. देशराज सिंह असे या रिक्षावाल्याचे नाव असून ते मूळचे हिमाचल प्रदेशातल्या कांगडा जिल्ह्यातील सगुर गावातील आहेत. गेल्या 34-35 वर्षांपासून ते मुंबईत रिक्षा चालवत आहेत. त्यांनी रिक्षालाच आपले घर बनवले आहे.
रिक्षामध्येच राहिल्याने घरभाड्याचे पैसे वाचतात
रिक्षावाले देशराज सिंह यांना मुंबईमध्ये राहण्यासाठी घर नाही. ते रिक्षातच राहतात. रिक्षातच झोपतात. मुंबईत भाड्याने घर घेतले तर, त्यावर कमीत कमी दोन ते तीन हजार रुपये दर महिन्याला खर्च होतील. त्यापेक्षा रिक्षामध्येच राहिल्याने हे पैसे वाचतात आणि ते त्यांच्या नातवंडांच्या शिक्षणासाठी कामी येतात, असे देशराज यांनी सांगितले. सध्या देशराज यांची आर्थिक प्राप्ती हाच त्यांच्या कुटुंबांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे.
शिक्षणाचे महत्त्व जाणले
स्वतः रिक्षावाले असून आणि स्वतःचे फार शिक्षण झालेले नसतानाही देशराज यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले आहे. आपल्या नातवंडांनी शिकून मोठे व्हावे, अशी एकमेव इच्छा मनाशी बाळगून देशराज मुंबईत काम करत आहेत. तसेच, त्यांच्या पत्नीचेही वय 65 वर्षांच्या पुढे असून त्याही गावाकडे राहून नातवंडांच्या शिक्षणाकडे लक्ष देत आहेत.
'मला वाटते की, माझ्या नातीने B.Ed करावे. जेव्हा तिचे B.Ed पूरे होईल तेव्हा ती शिक्षक बनेल आणि स्वतःच्या पायांवर उभी राहू शकेल. माझी फक्त एवढीच इच्छा आहे. माझ्या नातवंडांच्या वाट्याला चांगले आयुष्य यावे, असे मला वाटते. जोवर मी काम करू शकतो, तेवर त्यांच्यासाठी काम करत राहीन,' असा निर्धार या वृद्ध रिक्षावाल्याने व्यक्त केला.
अनेक संकटांनंतरही 'मोडला नाही कणा'
देशराज यांनी तीन मुले आणि एक मुलगी अशी एकूण चार मुले होती. यातील त्यांच्या मोठ्या मुलाचे 2016 मध्ये निधन झाले. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांचा दुसरा मुलगा सुद्धा मरण पावला. तिसरा मुलगा सुरक्षा रक्षकाच्या पदावर नोकरी करत होता. मात्र, लॉकडाऊनमध्ये त्याचीही नोकरी गेली. यावर दुःख न करत बसता त्यांनी धैर्याने आपल्या कामाकडे लक्ष दिले व संपूर्ण परिवाराची जबाबदारी स्वीकारली. 74 वर्षांचे वयोवृद्ध रिक्षाचालक देशराज नातू आणि नात यांच्या भविष्यासाठी दिवस-रात्र मेहनत करत आहेत.
देशराज म्हणतात, 'मुलांच्या मृत्यूचे खूप वाईट वाटते. ते दोघे धडधाकट होते. माझे वय झालेले असले तरी मी काम बंद केलेले नाही. माझ्या कुटुंबीयांना ते एकटे पडल्यासोरखे वाटू नये, यासाठी माझ्या परीने मी त्यांच्यासाठी शक्य ते सर्व करतो. कधी रिकामा वेळ घालवत नाही.'
या वयातही घेतली परिवाराची जबाबदारी
देशराज सिंह यांनी सांगितले की, ते एक दिवस सुद्धा सुट्टी घेत नाहीत. कारण, त्यांच्या परिवाराची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यांनी सांगितले की, त्यांची संपूर्ण मेहनत परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी असते. पुढे त्यांनी सांगितले की, त्यांना एक नात आणि नातू आहे. त्यांची नात दहावीमध्ये असून तिला पुढे शिकवण्यासाठी ते मनापासून मदत करत आहेत. परमेश्वरच माझा 'रखवाला' आहे, असा विश्वास बाळगत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही उदास न होता त्यांनी पुन्हा एकदा कामावर आणि रिक्षावर लक्ष केंद्रित करत या वयातही परिवाराची जबाबदारी घेतली.
देशराज म्हणतात की, 'माझी भारत सरकारला अशी विनंती आहे की, जेव्हा मी नसेन, तेव्हा माझ्या नातवंडांच्या शिक्षणात काही मदतीची गरज पडल्यास त्यांना पाठबळ द्यावे. जेणेकरून त्यांना चांगल्या प्रकारे शिकता येईल. सरकारद्वारे दिल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या सर्व योजना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात, अशीच मी हिमाचल सरकार आणि भारत सरकारकडून आशा करतो.'