मुंबई- गणेश गल्लीच्या गणपतीची मुंबईचा राजा अशी ओळख आहे. दरवर्षी विविध रुपातील आणि भव्य गणेश मूर्ती हे मुंबईच्या राजाची खासियत असते. परंतु, यंदा गणेशभक्तांना मंडपात हे चित्र दिसणार नाही. मुंबईच्या राजाची 22 फुटांची मूर्ती रद्द करुन 3 फुटांची मूर्ती बसवून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे.
अनेक वर्षांपासून गणेश गल्लीचा राजा अर्थात मुंबईच्या राजाची 22 फुटांची मनमोहक मूर्ती असते. प्रत्येक वर्षी इथे वेगवेगळ्या रुपातील बाप्पा दिसतो. केवळ भव्य मूर्तीच नाही तर मंडपातील देखावा पाहण्यासाठीही भाविक मोठी गर्दी करतात. परंतु, यंदा गणेशभक्तांना मोठी मूर्ती पाहायला मिळणार नसली तरी उत्सवाचा उत्साह मात्र कायम असेल.
मुंबई आणि गणेशोत्सवाचे खास नाते आहे. मुंबईत मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. परंतु, यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. कोरोना काळात गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तसेच गणेशमुर्तीच्या उंचीवर मर्यादा आणण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा रद्द
गिरणगावातील 101व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ (चिंचपोकळीचा चिंतामणी) ने यंदा लोकभावनेचा विचार करुन बाप्पांचा आगमन सोहळा रद्द केल आहे. तसेच सध्याची कोरोना परिस्थिती पाहता आणि पोलिसांवर असलेली जबाबदारी पाहता सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. चिंतामणीच्या मंडपातच मूर्ती घडवण्यात येणार आहे. मूर्तीच्या उंचीबाबत शासन जे निर्देश देईल त्यानुसार मूर्ती बनवण्यात येईल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष उमेश सिताराम नाईक यांनी दिली आहे. तसेच मूर्ती जागेवर घडवण्यासाठी चिंतामणीच्या मूर्तीकार रेश्मा विजय खातू यांनी तयारी दर्शवली आहे.
यंदाचा गणेशोत्सव हा सामाजिक भान ठेवून आणि समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करावा आणि जगासमोर उत्सवाचा नवा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडळांना केले आहे. पुणे आणि इतर बऱ्याच ठिकाणच्या गणेश मंडळांनी यावर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उत्सव साधेपणाने साजरा करण्याबाबत निर्णय घेतला आहे.