मुंबई - म्हाडाने मुंबईबाहेर घरे बांधावीत तसेच गिरणी कामगारांना बेलापूर, उरणमध्ये घरे द्यावीत, असे म्हाडाच्या बैठकीत गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सूचना केली होती. हा अजब सल्ला मराठी माणूस व सामान्य मुंबईकरांच्या विरोधी आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आला. त्यामुळे या सल्ल्याचा निषेध म्हणून घाटकोपरमध्ये विखे पाटील यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचा दहन करण्यात आला.
नुकत्याच झालेल्या राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारात भाजपवाशी झालेले काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गृहनिर्माण मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी म्हाडात एक बैठक घेतली. यात म्हाडाची घरे सर्व सामान्य नागरिक व गिरणी कामगार यांना परवडणारे नाहीत. त्यामुळे म्हाडाने मुंबईबाहेर घरे बांधावीत व गिरणी कामगारांना बेलापूर, उरणमध्ये घरे द्यावीत, असे वक्तव्य त्यांनी केले होते.
विखे पाटील यांच्या या सल्ल्याद्वारे मुंबईकर व मराठी माणसांना म्हाडामार्फत मुंबईच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या सूचनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज घाटकोपरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला.
मुंबई शहरातील मराठी माणसाला शहराबाहेर ढकलण्याचा डाव होत असल्याची शंका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मुंबईचे अध्यक्ष अमोले मातोले यांनी यावेळी उपस्थित केला. मराठी माणसाच्या खिशाला मुंबई शहरात घर घेणे परवडणार नाही. म्हणून ५० किलोमीटर लांब म्हाडाच्या इमारती बांधण्याची व्यवस्था करावी असे आदेश विखे यांनी काढले. अशा नेत्याने घेतलेल्या निर्णयाचा आम्ही धिक्कर करतो, असे मातेले यांनी सांगितले.
मुंबई शहरात मराठी माणसाच्या हितासाठी म्हाडा ही शासकीय संस्था उभारण्यात आली. मात्र त्याच्यामुळेच मराठी माणसाला शहराबाहेर काढून अन्याय होत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शांत बसणार नाही, असे पवित्रा मातेले यांनी घेतला आहे. आज पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला अल्पसंख्याक मुंबई शहर अध्यक्ष सोहील सुभेदार, घाटकोपर तालुका अध्यक्ष सुरेश भालेराव व तालुका कार्याध्यक्ष अन्वर दळवी यांच्यासोबत इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.