मुंबई - कोरोनाचा सर्वाधिक धोका हा ज्येष्ठ नागरिकांना असल्याचे सुरुवातीपासून सांगितले जात आहे. त्यानुसार आजही ज्येष्ठ नागरिकांनाच कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. कारण आतापर्यंत (29 जुलैपर्यंत) मुंबईत जे 6 हजार 244 मृत्यू झाले आहेत त्यातील तब्बल 5 हजार 113 मृत्यू हे 50 ते 100 वयोगटातील आहेत. तर या गटातील रुग्णांचा आकडा 46 हजार 972 इतका आहे. त्यामुळे ज्येष्ठांची योग्य ती काळजी घेण्याचा आणि त्यांना बाहेर न पडण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
कोरोनाचा संसर्ग होण्याची सर्वात जास्त भीती ही 50 वयोगटाच्या पुढील लोकांना आहे. त्यामुळे 50 च्या पुढच्या नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई घालण्यात आली आहे. असे असतानाही ज्येष्ठ नागरिक कोरोनाग्रस्त होताना दिसत आहेत. 29 जुलैपर्यंत मुंबईत 1 लाख 11 हजार 964 रुग्ण अॅक्टिव्ह असून यात 46 हजार 972 रुग्ण हे 50 ते 100 वयोगटातील आहेत. तर, 50 ते 60 वयोगटातील रुग्णांचा आकडा सर्वाधिक आहे. या वयोगटातील रुग्ण 21 हजार 730 इतके आहेत. 60 ते 70 वयोगटातील 15 हजार 43 रुग्ण असून 70 ते 80 वयोगटातील 7 हजार 478, 80 ते 90 वयोगटातील 2 हजार 466, 90 ते 100 वयोगटातील 254 तर 100 च्या पुढील 1 रुग्णाचा यात समावेश आहे.
मुंबईत 29 जुलैपर्यंत 6 हजार 244 रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. त्यातील तब्बल 5 हजार 113 जण हे 50 ते 100 वयोगटातील आहेत. म्हणजे एकूण मृत्यूंच्या 75 टक्क्यांहून अधिक मृत्यू हे ज्येष्ठ नागरिकांचे आहेत. तर, मुंबईचा मृत्यू दर 5.58 टक्के असताना ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यूदर 10 टक्क्यांहून अधिक आहे. वयोगटाप्रमाणे विचार करता 50 ते 60 वयोगटात 1 हजार 590 मृत्यू झाले आहेत. 60 ते 70 वयोगटातील 1 हजार 805 मृत्यू झाले असून याच वयोगटातील मृत्यूंचा आकडा सर्वाधिक आहे. त्यानंतर 70 ते 80 वयोगटातील 1 हजार 167 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 80 ते 90 वयोगटातील 504 रुग्णांचा तर 90 ते 100 वयोगटातील 46 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 100 च्या पुढील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
याविषयी बोलताना इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. अनिल पाचणेकर म्हणाले, ‘ज्येष्ठ नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यात वयाप्रमाणे विविध आजार बळावत जात असल्याने रोगप्रतिकारक शक्ती आणखी कमी होते. जितकी रोगप्रतिकारक शक्ती कमी तितका कोरोनाच्या संसर्गाचा धोका अधिक. त्यानुसार मुंबईत 50 च्या पुढच्या नागरिकांना कोरोनाची लागण मोठ्या संख्येने होत आहे. त्यातही चिंताजनक बाब त्यांच्यातील वाढत्या मृत्यूंची आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी मुख्य म्हणजे घराबाहेर पडूच नये. योग्य आहार घ्यावा, घरातच व्यायाम करावा, फळे खावीत, ताणतणाव घेऊ नये. तसेच कोरोनापासून बचाव करण्यासाठीच्या सर्व नियमांचे पालन करावे.’