मुंबई : विविध कामांच्या लोकार्पण व भुमीपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत येत आहेत. पंतप्रधानांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या मोठ्या प्रमाणात जाहिराती करण्यात आल्या आहेत. मात्र, राज्य सरकारने बेस्टला दिलेल्या जाहिरातींची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही.
बेस्टवर राज्य सरकारची जाहिरात : मुंबई महापालिकेचा बेस्ट उपक्रमाकडून शहर आणि उपनगरात गल्लोगल्ली परिवहन सेवा दिली जाते. बेस्टचे जाळे शहर आणि उपनगरात पसरले आहे. यामुळे बेस्टच्या बस गल्लोगल्ली जातात. याचा फायदा जाहिरातदारांना होतो. असाच फायदा राज्य सरकारकडून करून घेण्यात आला आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालिकेच्या सुशोभीकरण तसेच विविध प्रकल्पांचे उदघाटन आणि भूमिपूजन केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून बेस्टच्या बस आणि बस स्थानकांवर आपला दवाखाना तसेच मुंबई सुशोभीकरण प्रकल्प यांच्या जाहिराती मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या आहेत.
आकडेवारी गुलदस्त्यात : बेस्टच्या बसवर आणि बस स्टॉपवर ज्या प्रमाणात जाहिराती करण्यात आल्या आहेत. त्याची आकडेवारी बेस्ट उपक्रमाकडे मागितली असता ती आमच्याकडे नसल्याचे सांगण्यात आले. बेस्टने जाहिरातीसाठी एजन्सी नियुक्त केली आहे. या एजन्सीकडे आकडेवारी मिळू शकते असे बेस्टकडून सांगण्यात आले. बेस्टकडून साइन पोस्ट इंडिया या एजन्सीचे नाव सांगण्यात आले आहे. या एजन्सीकडे मागणी करूनही याबाबातची आकडेवारी या एजन्सीनेही उपलब्ध करून दिलेली नाही. यामुळे नेमक्या किती बस आणि बस स्टॉपवर जाहिराती करण्यात आल्या, याची आकडेवारीच समोर आलेली नाही.
गुप्त पद्धतीने कामकाज सुरु : मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते व बेस्ट समिती सदस्य रवी राजा यांच्याशी याबाबत ईटीव्हीने संपर्क साधला. ते म्हणाले की, पालिकेने याआधीच्या जाहिरातींसाठी बेस्टला २५ कोटी रुपये दिले आहेत. पालिकेत सध्या आयुक्त तथा प्रशासक यांचे गुप्त पद्धतीने कामकाज सुरु आहे. यामुळे काय निर्णय घेतले जातात, कोणत्या कामावर खर्च केला जातो याची कोणतीही माहिती नागरिक आणि माजी लोकप्रतिनिधींना मिळत नाही. पालिकेच्या व्यवहार पारदर्शक होण्यासाठी पालिकेत सभागृह, स्थायी समिती तसेच नगरसेवक असले पाहिजेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन : मेट्रो २ अ आणि ७ या दोन मार्गिकेचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या केले जाणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रोमधून प्रवास करणार आहेत. यावेळी पालिकेच्या सुमारे १५ प्रकल्पांचे सुशोभीकरणाचे आणि उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते केले जाणार आहे. याच कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन केले जाणार आहे.
हेही वाचा : Chinchwad Kasba Assembly Election - चिंचवड-कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर