मुंबई - राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग आणि रूग्णसंख्येच्या तुलनेत ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटापर्यंत ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे परदेशासह इतर राज्यातून ऑक्सिजनची आयात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हे आयात केले जाणारे ऑक्सिजन रेल्वे किंवा समुद्रमार्गे महाराष्ट्रात आणण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्याची माहिती मिळत आहे. याबाबत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याशी संपर्क साधला असता, माहिती घेऊन सांगतो, असे जुजबी उत्तर त्यांनी दिले.
म्हणून समोर आला समुद्रमार्गाचा पर्याय -
राज्यात ५ लाख ७५ हजारांच्या आसपास कोरोना रूग्ण आहेत. या रूग्णांसाठी दररोज १ हजार २७८ मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. राज्यात तयार होणाऱ्या ऑक्सिजनपेक्षा ही मागणी खूप जास्त आहे. दिवसागणिक वाढणारी रूग्णसंख्या लक्षात घेता, एप्रिलच्या शेवटपर्यंत या मागणीत आणखी वाढ होऊ शकते. त्यामुळे राज्य सरकारने अन्य राज्यांतून ऑक्सिजन आणण्याची तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विमानातून ऑक्सिजन आणण्याबाबत विचारविनिमय सुरू असल्याचे म्हटले होते. मात्र, ऑक्सिजन हवेतून आणणे तांत्रिकदृष्ट्या अडचणींचे ठरणार असल्याने आता रेल्वे किंवा समुद्रमार्गाचा पर्याय पुढे आला आहे.
सर्वाधिक वाचली गेलेली बातमी- निवृत्त पोलिसासोबत झालेल्या झटापटीत सराईत गुन्हेगाराचा मृत्यू, बघा थरारक VIDEO
रेल्वे मंत्रालय देखील सहकार्यासाठी तयार -
प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबवला जाणार असून केंद्रीय रेल्वे देखील याला मान्यता दिली आहे. मात्र, त्यासाठीचा खर्च, वेळ आणि किती ऑक्सिजन येतो हे तपासून पुढील निर्णय घेतला जाणार, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. देशात दररोज ७ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन तयार होतो. छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल, झारखंड येथून रेल्वेद्वारे ऑक्सिजन आणणार असल्याचे ते म्हणाले.
इतर राज्यांतून मिळेल अतिरिक्त साठा -
राज्यात ऑक्सिजन उत्पादकांची एकूण संख्या ३३ आहे तर, रिफिलिंग करणाऱ्यांची संख्या ९१ आहे. राज्यात ऑक्सिजन उत्पादनाची क्षमता १ हजार ३०० मेट्रिक टन असली, तरी दररोज १ हजार २०० मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन होत आहे. याचा वापर वैद्यकीय कारणांसाठी करण्याची तरतूद करण्यात आली आहे. सध्या राज्यात ऑक्सिजन पुरवठा आणि मागणी यात मोठा फरक पडत आहे. त्यामुळे भिलाई, बेल्लारी, बोकारो, रूरकेला, दुर्गापूर, हल्दिया, आदी ठिकाणाहून ऑक्सिजन साठा प्राप्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ३० एप्रिलपर्यंत वाढणाऱ्या रूग्णसंख्येचा विचार करता प्रत्येक दिवशी ३०० ते ५०० मेट्रिक टन अतिरिक्त साठा मिळणे गरजेचे असून तसे नियोजन केल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. परराज्यातून साधारणपणे ४०० मेट्रिक टन प्रतिदिन ऑक्सिजन पुरवठ्याचे नियोजन केले असून हा पुरवठा ३ ते ४ दिवसात सुरू होईल असेही, शिंगणे म्हणाले.
असे असेल परराज्यातून येणाऱ्या ऑक्सिजनचे नियोजन
- बेल्लारी प्लँट १ - याठिकाणाहून २०० मेट्रिक टन ऑक्सिजन मिळेल. औरंगाबाद विभागात याचा पुरवठा केला जाणार आहे.
- बेल्लारी प्लँट २ - या ठिकाणाहून १ हजार ४६७ मेट्रिक टन ऑक्सिजन मिळेल. हा ऑक्सिजन पुरवठा लातूर आणि उस्मानाबाद येथे केला जाईल.
- एअर वॉटर बेल्लारी - येथून ५१२ मेट्रिक टन ऑक्सिजन मिळेल. त्यासाठी टँकर आणि पुरवठ्याचे ठिकाण यांचे नियोजन सुरू आहे.
- हैदराबाद - येथून १०० मेट्रिक टन ऑक्सिजन राज्याला मिळेल. हा पुरवठा नांदेड, उस्मानाबाद, लातूर येथे होईल.
- भिलाई - याठिकाणाहून २ हजार २८९ मेट्रिक टन ऑक्सिजन मिळेल. प्रतिदिन सरासरी १०० मेट्रिक टन ऑक्सिजन मिळेल.
हेही वाचा - ऑक्सिजन पुरवठ्यावरून खासगी व जिल्हा शासकीय रूग्णालयात वादंग