मुंबई- शिवनेरीच्या तिकीट दरात भरघोस कपात केल्यानंतर एसटीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. मिळणारा प्रवासी प्रतिसाद पाहता एसटीने मुंबई-पुणे महामार्गावर नवीन 20 शिवनेरी बसेस सुरू करण्याचा संकल्प केला आहे. त्यातील 8 बसेस मुंबई-पुणे मार्गावर आज पासून (शुक्रवार) सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मार्गावर तब्बल 32 नव्या फेऱ्यांची भर पडली आहे.
गेली 15 वर्षे मुंबई-पुणे मार्गावर एसटीची शिवनेरी ही बससेवा या मार्गावरील कोणत्याही दळणवळण सेवेपेक्षा किफायतशीर, सुरक्षित व आरामदायी प्रवासी सेवा देत आहे. सध्या मुंबई-पुणे मार्गावर दिवसभरात शिवनेरीच्या 272 फेऱ्या सुरू आहेत. त्यामध्ये 32 फेऱ्यांची वाढ झालेली आहे. यामुळे दादर-पुणे, दादर-स्वारगेट, बोरिवली-स्वारगेट, ठाणे-स्वारगेट अशा विविध मार्गावर आज पासून 304 फेऱ्या दररोज चालणार आहेत.
या सेवेचा फायदा असंख्य प्रवाशांना होणार आहे. गेल्या महिनाभरामध्ये तिकीट दरात कपात केल्यामुळे मागील वर्षाचा तुलनेत एका महिन्यात अंदाजे 21 हजार प्रवाशांची वाढ झालेली आहे. शिवनेरीमध्ये महिला प्रवाशांसाठी 3 ते 12 अशी दहा आसने आरक्षित आहेत. सुरक्षित व सुखकर प्रवासासाठी महिला प्रवाशांची पहिली पसंती ही शिवनेरी आहे. वाढलेल्या फेऱ्या व कमी झालेले तिकीट दर याचा जास्तीत-जास्त फायदा प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.