मुंबई - आम्ही शिवसेनेला फसविले. ती चूक आम्ही कधी ना कधी दुरुस्त करु असे वक्तव्य भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केले होते. त्यांनी सभागृहात शिवसेनेला फसवल्याची कबुली दिली. मात्र, त्यानंतर मुनगंटीवार सोशल मिडीयावर बरेच ट्रोल झाले. मात्र, मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला असून, ते वक्तव्य विडबंनात्मक असल्याचे स्पष्टीकरण मुनगंटीवार यांनी दिले. तसेच आम्ही शिवसेनेला फसविले नसल्याचेही ते यावेळी म्हणाले.
आमच्याकडून त्यावेळी झालेल्या चुकीचा इतका मोठा फायदा घेवू नका. कदाचित उद्या तुमच्यातलाच एखादा ज्योतिरादित्य सिंधिया आमच्या सोबत येईल आणि आमचे सरकार पुन्हा येईल. त्यावेळी आम्ही स्थगितीचे नव्हे तर विकासाचे सरकार आणू असा विश्वास माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी विधानसभेत व्यक्त केला.
हेही वाचा - केरळमधील इंटरनेट क्षमता ३० ते ४० टक्क्यांनी वाढवणार; 'कोरोना'मुळे निर्णय
अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान सुधीर मुनगंटीवार बोलत होते. गुरुवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरुवात केली. यावेळी प्रश्नोत्तराच्या तासानंतर अध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षांना या चर्चेवर बोलण्याची संधी दिली. याला शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी आक्षेप घेतल. मात्र, विरोधी पक्ष नेत्यांनी चर्चा सुरु केल्यानंतर प्रथेप्रमाणे सत्ताधारी पक्षाकडून चर्चला सुरुवात व्हायला हवी होती. मात्र विरोधी पक्षाला संधी देवून सभागृहाच्या प्रथा-परंपरा आणि नियम मोडले जावू नयेत अशी मागणी त्यांनी केली.
अर्थमंत्र्यांनी केवळ राज्यातील जनतेलाच नाही तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यासोबतच स्वतःचीही फसवणूक करून घेतली. राजकारण हे सन्मानाचे, जनहिताचे असायला हवे. शिवसेनेच्या वचननाम्यातील केवळ दोन वचनांचाच अर्थसंकल्पात उल्लेख केला. त्यामुळे हा अर्थसंकल्प फसवा असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेनेबरोबरची आमची मैत्री ३० वर्षाची आहे. तर तुमच्या मैत्रीला अजून तीस महिनेही झाले नाहीत असा टोला लगावून ते पुढे म्हणाले की, शिवसेनेच्या शिवभोजन थाळीसाठी अर्थसंकल्पात तरतूद नाही. १० रूपयात देण्यात येणारी ही थाळी एकदाच देण्यात येणार आहे. कारागृहात एका कैद्यासाठी ८८ रूपयांचा खर्च येतो. गुन्हेगार असूनही त्याला सन्मानाची वागणूक मिळते तर दुसरीकडे जनतेला १० रूपयांची थाळी देवून त्यांची चेष्टा करत आहात का असा सवाल त्यांनी यावेळी केला.
१९६० नंतर सर्वाधिक तूटीचा अर्थसंकल्प मांडून या सरकारने जनतेची घोर निराशा केली आहे. आमच्या सरकारने विकासाचे राजकारण केले. मात्र हे सरकार स्थगितीचे राजकारण करत आहे. त्यावेळी आमच्याकडून झालेल्या चुकीचा इतका मोठा फायदा घेवू नका. कदाचीत उद्या तुमच्यातलाच एखादा ज्योतिरादित्य सिंदीया आमच्या सोबत येईल आणि आमचे सरकार पुन्हा येईल. त्यावेळी आम्ही स्थगितीचे नव्हे तर विकासाचे सरकार आणू असा विश्वास माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत व्यक्त केला.