मुंबई - उन्हाळी सुट्ट्यांची लगबग सगळीकडे पाहायला मिळत आहे. गावी आणि पर्यटनस्थळी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी रेल्वे आणि एसटी स्थानकावर वाढू लागली आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे ६०० पेक्षा अधिक गाड्या एप्रिल ते जून महिन्यापर्यंत सोडणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
उन्हाळी हंगामासाठी रेल्वे प्रशासनानेदेखील जय्यत तयारी केली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबई बाहेर जाणाऱ्यांची संख्या पाहता यावर्षीही रेल्वेने मेल-एक्स्प्रेस गाड्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागू नये, यासाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेने तब्बल ६०० पेक्षा अधिक उन्हाळी विशेष रेल्वेचे नियोजन केले आहे. यामुळे चाकरमान्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.
उत्तर भारत, कोकण, गोवा, कर्नाटकात जाणाऱ्या गाड्या जादा सोडण्यात येणार आहेत. यामध्ये कोकण पट्ट्यात १५० गाड्या तर इतर ठिकाणी साडे चारशे गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे जवळपास २५ हजार अतिरिक्त प्रवाशांची सोय होणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यानंतर आता गावी जाण्यासाठी गर्दी वाढत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला कार्यालयीन सुट्ट्यांमुळे अनेक जण पर्यटनासाठी कोकणात आणि इतर ठिकाणी जात असतात. यामुळे कोकण आणि गोव्याला जाणाऱ्या सगळ्या एक्सप्रेस गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. पहाटेच्या वेळेत सुटणाऱ्या गाड्या तसेच अधिक तिकीट दर असलेल्या डबलडेकर, तेजस एक्स्प्रेसमधील या काळातील प्रतीक्षा यादी वाढली आहे. त्यामुळेच ६०० पेक्षा अधिक गाड्या जादा सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे, अशी माहिती मध्य रेल्वे उप जनसंपर्क अधिकारी यांनी दिली.