मुंबई - पावसामुळे अडकलेल्या नागरिकांसाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या. सीएसएमटीवरून कल्याण, बदलापूर, कर्जत आणि टिटवाळा पर्यंत विशेष गाड्या सोडल्या, तर घाटकोपरवरून सीएसएमटीकडे येणारी एक रेल्वे सोडण्यात आली.
मुंबईसह उपनगरात गेल्या ४ दिवसांपासून पावसाची तुफान बॅटींग सुरू आहे. अनेक ठिकाणी सखल भागात आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला होता. सोमवारी रात्री पासूनच ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे रेल्वेसेवा देखील कोलमडून पडली होती. मात्र, आता पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे साचलेले पाणी कमी होत आहे. त्यामुळे ठप्प झालेली रेल्वेसेवा देखील पूर्वपदावर येत आहे.
सोमवारी कामानिमित्त बाहेर पडलेले नागरिक आपल्या घरी सुरक्षीत पोहोचावे यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करीत आहे. सध्या लोकल सेवा सुरू नसली तरी विशेष गाड्यांमुळे पावसात अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत होणार आहे. आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सीएसटीहून कल्याण, बदलापूर, कर्जत आणि टिटवाळा या विशेष रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. तसेच सायन व कुर्ला मार्गात पाणी साचल्याने ठाण्याहून सीएसटीकडे येणारी रेल्वे सेवा रात्रीपासून बंद होती. त्यामुळे मुंबईतील अनेक प्रवाशी ठाण्यात अडकलेले होते. पाण्याचा निचरा झाल्यानंतर त्यांच्यासाठी २ वाजता घाटकोपरहून सीएसएमटीच्या दिशेने जाणारी एक विशेष रेल्वे सोडण्यात आली.