मुंबई - कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. खासगी डॉक्टरांचे दवाखानेदेखील बंद आहेत. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड येथील डॉ. संजय दुबे या सगळ्याला अपवाद आहेत. कठीण काळात देखील ते सकाळी 11 ते रात्री 11 असे 12 तास सेवा देत आहेत. त्यांचे स्वतः चे क्लिनिक निवासी भागात असल्यामुळे इतरांना धोका नको म्हणून, त्यांनी एका वाचनालयात क्लिनिक सुरू केले आहे. येथेच ते रुग्णांना सेवा देत आहेत.
जोगेश्वरी परिसरात प्रचंड दाटीवाटी आहे. खासगी दवाखाने काही ठिकाणी बंद असल्यामुळे सामान्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना तपासणी करण्यासाठी विशेष सोय उपलब्ध नव्हती. यामुळे रुग्णांची गैरसोय होत होती. त्यात डॉ. दुबे यांच्या सुखसागर सोसायटी येथील क्लिनिकमध्ये रुग्ण वाढत होते. त्यांचे क्लिनिक निवासी भागात असल्यामुळे जर त्या ठिकाणी एखादा कोरोनाबाधित रूग्ण आल्यास त्याचा प्रादुर्भाव या निवासी भागात होण्याची शक्यता होती. यासाठी डॉ. दुबे यांनी शक्कल लढवत जवळच असणाऱ्या एका वाचनालयात त्यांचे क्लिनिक स्थानिकांच्या मदतीने हलवले. इथे ते दिवसाला 50 पेक्षा जास्त रुग्ण तपासतात. ज्यांना कोरोनाची लक्षणे आहेत त्यांना टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो.
मुंबईत परिस्थितीत खराब झाली आहे. मुंबईच्या सर्वच भागात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. या परिस्थितीत अनेक खासगी डॉक्टरचे दवाखाने बंद आहेत. मात्र, जर खासगी डॉक्टरांनी सेवा दिली तर पालिका रुग्णालयावर ताण कमी पडेल. यामुळे मी या कोरोना काळात रुग्णसेवा देत आहे. माझे क्लिनिक निवासी भागात असल्यामुळे तेथील नागरिकांना त्रास नको म्हणून मी या भागातील वाचनालयात रुग्णसेवा देत आहे. यावेळी नियमाचे पालन ही केले जात आहे. रुग्ण सोशल डिस्टन्सिंगचा वापर करतात. लवकरच कोरोना विरुद्ध आपण लढाई जिंकू, असा विश्वास ही दुबे यांनी व्यक्त केला आहे.