मुंबई - तुमचे ध्येय ठरलेले असेल तर तुम्ही काहीही करू शकता. याचेचे एक मूर्तीमंत उदाहरण म्हणजे ज्ञानेश येडगे. ज्ञानेश यांनी धोबीतलाव येथील केळी विक्रेता ते पोलीस उपनिरीक्षक, असा प्रवास यशस्वीपणे पार केला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पीएसआय पदासाठीच्या परीक्षेत राज्यात खुल्या प्रवर्गातून ज्ञानेशने १६१ वा क्रमांक पटकावला आहे.
ज्ञानेशच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर संपूर्ण घराची जबाबदारी त्यांच्यावर आली. केळी विकण्याचा व्यवसाय सांभाळत त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
पदवीनंतर ज्ञानेशने एअर इंडियाच्या सुरक्षा विभागात नोकरी पत्करली. तसेच MPSC चा अभ्यास सुरू केला. पहिल्या ३ प्रयत्नांत मुख्य परीक्षेपर्यंत पोहोचल्या नंतरही यश हुलकावणी देत होते. त्यामुळे ज्ञानेशने मनाशी जिद्द बाळगून एअर इंडियाचा राजीनामा दिला आणि पूर्ण वेळ अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. अखेर यावर्षी ज्ञानेशला यश मिळाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांचा ८ मार्चला निकाल होता. निवडीचा निकाल हाती आल्यानंतर ज्ञानेशचा आनंद द्विगुणित झाला. मला जे यश मिळाले ते पहायला माझे वडील नाहीत, असे म्हणत त्याने खंत व्यक्त केली.
मनात जिद्द असल्यास प्रतिकुल परिस्थितवर मात करूनही यश मिळवू शकता, हे ज्ञानेश्वर यांनी दाखवून दिले.