मुंबई - कोरोना संकटामुळे गेले 2 महिने बंद असलेली भारतातील विमान सेवा काही प्रमाणात सुरू करण्यात आली आहे. ही विमानसेवा केवळ देशांतर्गत सुरू झाली आहे. मुंबई विमानतळावर आज (सोमवारी) दिवसभरात फक्त 25 विमानांचे उड्डाण करण्यात येणार होते. मात्र, यामधील काही विमान उड्डाणे ही तांत्रिक अडचणींमुळे रद्द करण्यात आलेल्या बऱ्याच प्रवाशांची गैरसोय झाली. आपल्या घरी जाण्यासाठी उत्सुक असलेल्या काही प्रवाशांनी पहाटे 5 वाजताच मुंबई विमानतळावर हजेरी लावली होती. मात्र पहाटे मुंबईहून गुवाहाटी येथे जाणार विमान रद्द झाल्याने प्रवाशांची विमानतळावरील कर्मचाऱ्यांसोबत वाद झाल्याचे पाहायला मिळाले.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अडकलेल्या मेहबुब प्रवाशाने गुवाहाटी येथे त्याच्या घरी ईद साजरी करण्यासाठी विमानाचे तिकीट बुक केले होते. मात्र, पहाटे 5 वाजता त्यास विमान रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबईत राहत असलेले घर मेहबूब यांनी रिकामे केल्यामुळे आता त्यांच्याकडे आता दुसरा पर्याय उरलेला नाही. मेहबूब यांनी विमानसेवा सुरू होत असल्यामुळे इंडिगो विमानांचे तिकीट बुक केले होते. कुटुंबासोबत यावेळची ईद साजरी करण्यास मिळणार म्हणून ते खूप खुश होते. मात्र, आता प्रशासनाने त्यांची गुवाहाटी येथे जाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कोरोनाची सध्याची स्थिती लक्षात घेता देशातील काही निवडक विमानतळावर नव्या नियमावली नुसार काही प्रमाणात विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. ती आता टप्य्याटप्याने वाढविण्यात येणार आहे.